UGC Final Year Examinations Case: विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांसंदर्भात सुप्रिम कोर्टाकडून अद्याप निर्णय नाही; पुढील सुनावणी 18 ऑगस्टला
विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगच्या निणर्याला आव्हान देण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र अद्याप अंतिम निर्णय झाला नसून कोर्टाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.
विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (University Grants Commission) निर्णयाला आव्हान देण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडली. मात्र अद्याप अंतिम निर्णय झाला नसून कोर्टाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. 18 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे अंतिम निर्णयासाठी विद्यार्थ्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. (पहा, 10 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत नेमके काय घडले)
यापूर्वी 10 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत सॉलिसेटर जनरल तुषार मेहता यांनी युजीसीची बाजू मांडली होती. त्यात त्यांनी परीक्षा रद्द करणं विद्यार्थ्यांच्या हिताचं नसल्याचं म्हटलं होतं. तसंच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही, असेही म्हटले होते.
महाराष्ट्रासह दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, ओडिशा, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी विद्यापीठांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तसंच महाराष्ट्रातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी UGC च्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. तर देशभरातून 31 याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.
विद्यापीठांनी सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत परीक्षा घ्याव्यात असे UGC चे म्हणणे होते. तसंच परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची ही मुभा देण्यात आली होती. परीक्षा घेण्याच्या निर्णयावर विद्यापीठ अनुदान आयोग ठाम असून परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होऊ शकतो, असे यापूर्वीच्या सुनावण्यांमध्ये UCG ने म्हटले होते. तर पूर्वीच्या सेमिस्टरच्या सरासरीने अंतिम निकाल लावाला, असे राज्य सरकारचे म्हणणे होते. दरम्यान, या गुणांवर संतुष्ट नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना संकटकाळानंतर परीक्षा घेण्यात येणार येईल असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 14, 2020 03:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

