IDOL January 2021 Admission: मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेचे प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; 30 जानेवारी पर्यंत अर्ज भरण्यास मुदत

यामध्ये प्रथम जुलै आणि त्यानंतर जानेवारी मध्ये प्रवेश प्रक्रिया खुली केली जाते.

Mumbai University (Photo Credits- Facebook)

यंदा कोरोना वायरस संकटामुळे शैक्षणिक वेळापत्राचे तीन तेरा वाजले आहेत. पण हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत असताना ऑनलाईन सोबत ऑफलाईन पर्याय देखील आता सुरू होत आहेत. दरम्यान आता मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (IDOL) जानेवारी सत्राच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मंगळवार, 19 जानेवारी पासून इच्छुक उमेदवारांना त्यासाठी अर्ज भरता येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत 12वी मध्ये फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सोबतच प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

आयडॉलच्या जानेवारी सत्राच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना प्रथम आणि द्वितीय सत्र एफवाय बीए, एफवाय बीकॉम, एमएचे सेमिस्टर एक आणि दोनच्या इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल. तसेच एमकॉम सेमिस्टर एक आणि दोन या वर्षांसाठी प्रवेश घेता येईल. त्याचप्रमाणे एसवायबीए, एसवायबीकॉम सोबतच एमए व एमकॉमचे पार्ट दोनची ही प्रवेश प्रक्रिया या कालावधीत होईल. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचे आहेत त्यांना 30 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे. वेबसाईट वरूनच हे अर्ज भरण्याची मुभा असेल.

2017 च्या नियमावली नुसार आता मूंबई विद्यापीठाच्या आयडॉलमध्ये वर्षातून दोनदा विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये प्रथम जुलै आणि त्यानंतर जानेवारी मध्ये प्रवेश प्रक्रिया खुली केली जाते. मागील वर्षी 1 हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यावर्षी कोरोन, अनेकांच्या नोकर्‍यांवर आलेले गडांतर तर शुल्क भरण्यास पैसे नसल्याने अनेकांनी प्रवेश न घेतलेल्या अनेकांना आता ही संधी मिळणार आहे.