Snowfall in Himachal Pradesh: हिमाचलमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत; तीन राष्ट्रीय महामार्गांसह 226 रस्ते बंद
त्यामुळे 3 राष्ट्रीय महामार्गांसह एकूण 226 रस्ते बंद करण्यात आले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घसरण झाली असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Snowfall in Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टीमुळे (Snowfall) 3 राष्ट्रीय महामार्गांसह एकूण 226 रस्ते बंद करण्यात आले आहेत. राज्यातील शिमला (Shimla)आणि अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घसरण झाली असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासांत जोतमध्ये 10 सेमी बर्फवृष्टी झाली, त्यानंतर खडराळा (5 सेमी), पूह (2 सेमी), सांगला (1.2 सेमी) आणि केलॉन्ग (1 सेमी) येथे किमान तापमानात घट झाली. लोक कडाक्याच्या थंडीने त्रस्त झाले आहेत.
लाहौल आणि स्पिती जिल्ह्यातील ताबो हे हिमाचल प्रदेशातील सर्वात थंड ठिकाण होते. जेथे रात्रीचे तापमान उणे 10.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. अटारी आणि लेह, कुल्लू जिल्ह्यातील सेंज ते औट, किन्नौर जिल्ह्यातील खाब संगम आणि लाहौल आणि स्पिती जिल्ह्यातील ग्रंपू या तीन राष्ट्रीय महामार्गांसह एकूण 226 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
3 राष्ट्रीय महामार्गांसह एकूण 226 रस्ते बंद
अटारी-लेह रस्ता, सांज ते औट (कुल्लू), खाब संगम (किन्नौर) आणि ग्रामफू (लाहौल आणि स्पिती) यासारखे मुख्य मार्ग प्रभावित झाले आहेत. शिमलाचे 123 रस्ते, लाहौल आणि स्पितीचे 36 रस्ते आणि कुल्लूचे 25 रस्ते बंद करण्यात आले आहेत. बर्फवृष्टीमुळे राज्यभरात 173 ट्रान्सफॉर्मर खराब झाले असून, त्यामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अनेक भागात थंडीत लोकांना विजेविना दिवस काढावे लागत आहेत.
पाऊस आणि हिमवर्षाव अंदाज
शुक्रवारी संध्याकाळपासून रविवारी दुपारपर्यंत हिमाचलच्या काही भागात विशेषतः शिमलामध्ये पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये तीव्र थंडी आणि दाट धुक्याचा इशारा दिला आहे.