औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर देशभरात बंदी; दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश

डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याशिवाय दिवसभरात लाखो औषधांची ऑनलाईन विक्री होत असल्याचे रुग्णांच्या जीवाला धोका असल्याने न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Maxi Pixel)

औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर (Online Sale of Medicines) दिल्ली उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. देशभरात औषधांची ऑनलाईन विक्री न करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) दिले आहेत. दिल्लीतील त्वचारोगतज्ञ झहीर अहमद (Dermatologist Zaheer Ahmed) यांनी यासंदर्भात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याशिवाय दिवसभरात लाखो औषधांची ऑनलाईन विक्री होत असून रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याने यावर तातडीने बंदी घालण्यात यावी, असे या याचिकेत म्हटले आहे.

तीन वर्षांपूर्वी 2015 मध्ये ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सर्व राज्यातील ड्रग कंट्रोलर्संना डॉक्टरांच्या प्रिसक्रिप्शनशिवाय औषधांची ऑनलाईन विक्री न करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे अहमद यांच्या याचिकेने उच्च न्यायालयच्या निर्देशनास आणून दिले. ऑनलाईन औषधांच्या अनियंत्रित विक्रीमुळे कमी प्रमाणात विकली जाणारी औषधे देखील विकली जातात. त्यापैकी काही मनोवैज्ञानिक पदार्थ असून त्याचा गुन्हेगारी कारवाईसाठी गैरवापर होऊ शकतो, असेही या याचिकेत म्हटले आहे.

मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि न्यायमूर्ती व्ही.के राव यांनी दिलेल्या आदेशानुसार केंद्र आणि दिल्ली सरकारला ऑनलाईन औषध विक्रीवर त्वरित बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.