IPL Auction 2025 Live

New CM of Punjab: अमरिंदर सिंग यांच्यानंतर चरणजित सिंह चन्नी सांभाळणार पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी

यानंतर पंजाबचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Charanjit Singh Channi (Photo Credit: Twitter)

कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी शनिवारी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली होती. यानंतर पंजाबचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाच्या यादीत अनेक नेत्यांचा समावेश होता. परंतु, त्या सर्वांना मागे टाकत पक्षाने चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्याकडे पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुखजिंदर सिंह यांच्या नावाची अधिक चर्चा होती. परंतु, काँग्रेस हायकमांडने पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी चरणजित सिंह यांच्या नावाची घोषणा केली आहे.

काँग्रेसचे पंजाब युनिटचे वरिष्ठ नेते चरणजीत सिंह चन्नी यांची रविवारी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून निवड झाली आणि आता ते राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील, अशी माहिती काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरीश रावत यांनी दिली आहे. हे देखील वाचा-पंजाब मध्ये राजकीय घडामोडींना वेग; मुख्यमंत्र्यांसोबत 2 उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीची शक्यता; सूत्रांची माहिती

एएनआयचे ट्विट-

पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून चरणजित सिंह चन्नी यांची घोषणा केल्यानंतर काँग्रेस नेते सुखजिंदर सिंह रंधावा आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा हायकमांडचा निर्णय आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो. चन्नी हे माझ्या लहान भावासारखे असून त्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केल्याबाबत मी अजिबात निराश नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.