Car-Bus Collision In Rajasthan: राजस्थानच्या करौली येथे बस आणि कारची धडक; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, 15 जखमी

या अपघातात कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर बसमधील 15 प्रवासीही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Karauli Road Accident (फोटो सौजन्य - X/@Swadeshinews11)

Car-Bus Collision In Rajasthan: राजस्थानमधील करौली जिल्ह्यात (Karauli District) मंगळवारी रात्री एक मोठा रस्ता अपघात (Accident) झाला. खासगी बस आणि कारमध्ये जोरदार धडक (Car-Bus Collision) झाली. या अपघातात कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर बसमधील 15 प्रवासीही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, यात कार आणि बसचा चक्काचूर झाला.

अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू -

या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताचं डीएम नीलाभ सक्सेना, एसपी ब्रिजेश ज्योती उपाध्याय आणि एएसपी गुमनाराम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कार आणि बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आणि जिल्हा रुग्णालयात नेले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा -Pune Accident: पुणे वानवडीमध्ये अपघातानंतर पोलीस उपायुक्तांनी वाचवले तरुणाचे प्राण)

कारमधील मृतांची ओळख पटली -

मृतांमध्ये पती-पत्नी, मुलगा-मुलगी आणि एका महिला नातेवाईकाचा समावेश आहे. मृताच्या कारमध्ये सापडलेल्या आधारकार्डवरून सर्वांची ओळख पटली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 मृतांपैकी 3 महिला होत्या.

कारमधील प्रवासी कैलादेवीचे दर्शन घेतल्यानंतर गंगापूर शहरात जात असताना करौलीकडे येणारी बस कारला धडकली. या अपघातात नयनकुमार देशमुख, अनिता देशमुख (पत्नी), मनस्वी देशमुख (मुलगी), खुशदेव देशमुख (मुलगा), प्रीती भट्ट (नातेवाईक) यांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा -Sikar Bus accident: राजस्थानच्या सीकरमध्ये भीषण बस अपघात; 12 जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर)

जिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी रमेश मीना यांनी सांगितले की, करौली गंगापूर रस्त्यावर कार आणि बस यांच्यात झालेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, कैलादेवीचे दर्शन घेऊन परतत असताना बसमध्ये प्रवास करणारे 15 जण जखमी झाले. अपघातात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह करौली जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.