Nawab Malik यांच्या अटकेमुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ; महाविकास आघाडीचे नेते आज रस्त्यावर उतरणार, भाजप करणार राजीनाम्याची मागणी
अटक करण्यापूर्वी बुधवारी मलिक यांची सुमारे सहा तास चौकशी करण्यात आली.
मनी लाँड्रिंग आणि दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेनंतर आज राज्यातील वातावरण तापलं आहे. नवाब मलिक यांना न्यायालयाने 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. मलिक यांच्या अटकेला महाराष्ट्र सरकार कडाडून विरोध करत आहे. या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) कार्यकर्ते आणि नेते आज रस्त्यावर उतरणार आहेत. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते ईडीच्या विरोधात आंदोलन करणार आहेत.
याशिवाय भाजपही नवाब मलिक यांच्याबाबत आज रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजप नेते आंदोलन करणार आहेत. (वाचा - Nawab Malik Arrested: नवाब मलिक यांच्या अटकेवरून उद्या माविआचे निदर्शने, भाजपही राजीनाम्यासाठी आंदोलन करण्याची शक्यता)
नवाब मलिक यांना महाराष्ट्र सरकारचा पाठिंबा -
नवाब मलिक यांना महाराष्ट्र सरकार उघडपणे पाठिंबा देत आहे. मलिक यांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक झाली. नवाब मलिक यांचा राजीनामा स्वीकार केला जाणार नाही, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही नवाब मलिक यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, महाविकास आघाडी समोरासमोर लढू शकत नाही, त्यामुळे मागून अफजलखानी युद्ध सुरू आहे, ते जाऊ द्या. एखाद्या मंत्र्याला फसवून घुसखोरी करून आनंद होत असेल तर राहू द्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नका. लढत राहा आणि जिंका. कंस आणि रावणाचाही वध झाला. हा हिंदू धर्म आहे.
नवाब मलिक यांना दीर्घ चौकशीनंतर अटक -
नवाब मलिक यांच्यावर काही मालमत्ता सौद्यांमध्ये मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींशी संबंध असल्याचा आरोप आहे. अटक करण्यापूर्वी बुधवारी मलिक यांची सुमारे सहा तास चौकशी करण्यात आली. सकाळी 8 वाजता मलिक यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानातून त्यांच्या कार्यालयात आणले. 6 तासांच्या चौकशीनंतर मलिक यांला अटक करण्यात आली. अटकेनंतर मलिक म्हणाले की, आम्ही लढू, जिंकू आणि सर्वांचा पर्दाफाश करू.