Meerut Train Fire: सहारनपूरहून दिल्लीला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला आग, इंजिनसह 2 डब्बे जळून खाक

इंजिनाजवळ असलेल्या डब्यातील प्रवाशांना पायाखालून धूर व ठिणग्या निघताना दिसल्यावर त्यांनी आवाज करत खाली उतरून फलाटावर धाव घेतली.

Meerut Train Fire (PC - Twitter)

Meerut Train Fire: उत्तर प्रदेशातील सहारनपूरहून दिल्लीला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला (Passenger Train) शनिवारी सकाळी मेरठमधील दौराला स्टेशनवर आग (Fire) लागली. ट्रेनचा ब्रेक जाम झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. भीषण आगीमुळे रेल्वेच्या इंजिनसह दोन डबे जळून खाक झाले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन दौराला स्टेशनवर पोहोचताच तिच्या इंजिनला खालून आग लागली. इंजिनाजवळ असलेल्या डब्यातील प्रवाशांना पायाखालून धूर व ठिणग्या निघताना दिसल्यावर त्यांनी आवाज करत खाली उतरून फलाटावर धाव घेतली. त्याने इतर प्रवाशांना आणि चालकाला सावध केले. ट्रेनला आग लागल्याची माहिती मिळताच मागील डब्यातील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. ते घाईघाईने ट्रेनमधून उतरले आणि इतर प्रवाशांना कळवण्यासाठी आवाज करत प्लॅटफॉर्मवर पळू लागले. (वाचा - Indian Railways Cancel Train List: रेल्वेने आज 216 गाड्या रद्द केल्या; घरातून बाहेर पडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची यादी पहा)

दुसरीकडे इंजिनमधील आगीने भीषण रूप धारण केले. आगीच्या उंच ज्वाळा उठू लागल्या. आग मागील डब्यांमध्ये पसरू लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या येईपर्यंत इंजिनसह दोन डब्यांना आग लागली होती. आग इतकी भीषण होती की, काही वेळातचं दोन्ही डब्बे जळून खाक झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांसह आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, काही प्रवाशांच्या मदतीने ट्रेनचे इतर डबे वेगळे करण्यात आले.

ट्रेनमधून उतरून आपला जीव वाचवणाऱ्या प्रवाशांनी सांगितले की, त्यांना देवबंदमधूनच काही आवाज ऐकू येत होता. वासही जाणवत होता. पण नंतर याचे कारण कोणालाच समजले नाही. त्यानंतर अचानक सीटखालून धूर येऊ लागला. काही प्रवाशांनी सांगितले की, इंजिनमधून धूर निघत असल्याचे ड्रायव्हरला सांगण्यासाठी त्यांनी खूप आवाज केला पण त्यांच्यापर्यंत ही बाब पोहोचू शकली नाही. मातौर गावात पोहोचलो तोपर्यंत धूर खूप वाढला होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. दौराला स्थानकावर गाडी थांबताच प्रवासी खाली उतरले आणि आरडाओरड करत धावले.