Fire in Ahmedabad: अहमदाबादमधील इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग; एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू
मात्र, मुलीच्या कुटुंबातील अन्य चार सदस्य जीव मुठीत घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. ही घटना शाहीबाग परिसरातील 11 मजली ऑर्किड ग्रीन सोसायटीत पहाटे घडली
Fire in Ahmedabad: गुजरातमधील अहमदाबादमध्ये (Ahmedabad) शनिवारी सकाळी एक वेदनादायक दुर्घटना घडली. येथील एका निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग (Fire) लागली. या घटनेत फ्लॅटमध्ये एका 17 वर्षीय तरुणीचा आगीने होरपळून मृत्यू झाला. मात्र, मुलीच्या कुटुंबातील अन्य चार सदस्य जीव मुठीत घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. ही घटना शाहीबाग परिसरातील 11 मजली ऑर्किड ग्रीन सोसायटीत पहाटे घडली. विभागीय अग्निशमन अधिकारी ओम जडेजा यांनी सांगितले की, अग्निशमन दलाच्या जवानांनी सातव्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून प्रांजल जिरवाला यांना बाहेर काढले. त्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला.
इमारतीच्या वरच्या मजल्यावरून किमान 40 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जडेजा म्हणाले की, संबंधित फ्लॅटच्या बाथरूममधील गिझर जास्त वेळ चालू राहिल्याने विद्युत वायरिंग जास्त तापल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. (हेही वाचा - Karnataka Shocker: अल्पवयीन हिंदू तरुणीसोबत फिरत असल्याच्या कारणावरून मुस्लिम तरुणाला मारहाण)
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरेश जीरवाला यांच्या फ्लॅटमध्ये आग लागली, तिथे ते पत्नी आणि दोन मुलांसह राहत होतेय त्याची भाचीही त्याच्यासोबत राहत होती. सकाळी ती आंघोळीसाठी गेली असता अचानक आग लागली आणि ही आग बेडरूममध्ये पसरली. ज्वाळा वाढू लागताच सुरेश जीरवाला, त्यांची पत्नी आणि दोन मुले बाहेर पळत आले. मात्र, प्रांजल आत अडकली. तिने फ्लॅटच्या बाल्कनीतून मदतीसाठी आरडाओरड केली. बाल्कनीत लोखंडी जाळी होती. सुटका करणाऱ्यांचे पथक आठव्या मजल्यावरून शिडी व इतर साधनांच्या साहाय्याने फ्लॅटवर पोहोचले आणि त्यांनी ग्रील कापले.
अधिका-यांनी सांगितले की, जेव्हा मुलीला बाहेर काढले तेव्हा ती बेशुद्ध होती. पण तिच्या शरीरात हालचाल होत होती. त्यांनी सांगितले की, तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. परंतु ती गंभीरपणे भाजली होती. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या 15 गाड्यांनी 35-40 मिनिटांत आग आटोक्यात आणली.