Ujjain Shocker: बलात्काराच्या अयशस्वी प्रयत्नानंतर 60 वर्षीय वृद्धाने महिलेच्या शरीराचे केले दोन तुकडे; आरोपी अटकेत
त्यानंतर महिलेच्या शरीराचे दोन तुकडे करून दोन रेल्वे गाड्यांमध्ये टाकले, घटना उघडकीस येताच पोलिसांनी तपास करत वृद्ध आरोपीला अटक केली आहे.
Ujjain Shocker: मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh)उज्जैन येथे रविवारी एका 60 वर्षीय व्यक्तीला बलात्काराचा(Rape) प्रयत्न आणि हत्ये प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या घटनेत आरोपीने महिलेच्या शरीराचे दोन तुकडे करून त्याचे भाग दोन गाड्यांमध्ये टाकले असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. कमलेश पटेल असे आरोपीचे नाव आहे.
10 जून रोजी उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे एका ट्रेनमध्ये 37 वर्षीय पीडितेचे हात आणि पाय सापडले होते. आता त्या घटनेचा उलगडा झाला आहे. पतीसोबत झालेल्या भांडणानंतर ही महिला 6 जून रोजी घरातून निघून गेली होती. ही महिला मथुरेला जाण्यासाठी उज्जैन रेल्वे स्थानकावर बसली होती, तेव्हा पटेलने तिला आपल्या घरी फूस लावून नेले. तिला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्याने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने प्रतिकार करत त्याला रोखले, असे रेल्वेचे पोलीस अधीक्षक संतोष कोरी यांनी सांगितले.
त्यावर, रागाच्या भरात पटेलने तिचा गळा दाबून खून केला, तिच्या शरीराचे तुकडे केले आणि इंदूर-नागदा आणि इंदूर-डेहराडून पॅसेंजर ट्रेनमध्ये ठेवले. 10 जून रोजी उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे एका ट्रेनमध्ये 37 वर्षीय पीडितेचे हात आणि पाय सापडले होते. तर उर्वरित मृतदेह 9 जून रोजी इंदूरमधील ट्रेनमधून बाहेर काढण्यात आला,” असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, 12 जून रोजी रतलाम जिल्ह्यातील बिलपंक पोलीस ठाण्यात महिलेच्या नातेवाईकांनी ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती, असे कोरी यांनी सांगितले. सध्या पोलिसांनी पटेलला उज्जैन येथून ताब्यात घेतले असून गुन्ह्यात वापरलेला चाकू इतर पुरावे जप्त करण्यात आले आहेत.