Odisha: ओडिशात कोचिंग सेंटरमध्ये झोपलेल्या 3 विद्यार्थ्यांचा सर्पदंशामुळे मृत्यू; एकाची प्रकृती चिंताजनक

मुलांना साप चावल्याचे आम्ही बाहेरच्या लोकांकडून ऐकले. आम्हाला कोचिंग सेंटरचा एकही सदस्य हॉस्पिटलमध्ये सापडला नाही.

Snake (PC -Pixabay)

Odisha: ओडिसामधील केओंझार जिल्ह्यातील बरिया पोलीस स्टेशन परिसरात सर्पदंशाने (Snakebite) तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे विद्यार्थी निशितपर्जली येथील कोचिंग सेंटरमध्ये होते. मृतांमध्ये दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. आणखी एका विद्यार्थ्याला कटक येथील एससीबी मेडिकल हॉस्पिटलमध्ये गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, 12 वर्षीय राजा नायक, 10 वर्षीय स्नेहाश्री नायक आणि 7 वर्षीय अलिना नायक अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर 12 वर्षीय आकाश नायक असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री कोचिंग सेंटरमध्ये झोपलेले असताना या विद्यार्थ्यांना साप चावला. हा साप कोणत्या जातीचा होता हे अद्याप समजू शकलेलं नाही. ही घटना रात्री 3 वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळी 7.30 वाजता कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळाली. (हेही वाचा - Rajasthan Shocker: धक्कादायक! प्रेयसीच्या साखरपुड्याची माहिती मिळाल्याने प्रियकराने चिरला प्रेयसीचा गळा; नंतर स्वत: गळफास लावून केली आत्महत्या)

मृत एलीनाची आई दमयंती नायक यांनी सांगितले की, ती शनिवारी संध्याकाळी आपल्या मुलीशी फोनवर बोलली. मुलीने 30 जुलैला घरी येणार असल्याचे सांगितले होते, मात्र आज सकाळी मुलगी येत नसल्याचा फोन आला. अलीनाच्या एका नातेवाईकाने सांगितले की, ही घटना पहाटे 3 वाजता घडली, परंतु त्यावेळी कुटुंबाला याची माहिती देण्यात आली नव्हती. मुलांना साप चावल्याचे आम्ही बाहेरच्या लोकांकडून ऐकले. आम्हाला कोचिंग सेंटरचा एकही सदस्य हॉस्पिटलमध्ये सापडला नाही.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू सर्पदंशामुळे झाला की, यामागे आणखी काही कारण होते, हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.