Atiq Ahmed Murder Case: अतिक अहमद आणि त्याच्या भावाच्या मारेकऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
गँगस्टर-राजकारणी अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अश्रफ (Ashraf Ahmad) यांच्या तीन मारेकऱ्यांना रविवारी स्थानिक न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
Atiq Ahmed Murder Case: गुंड-राजकारणी अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अश्रफ (Ashraf Ahmad) यांच्या तीन मारेकऱ्यांना रविवारी स्थानिक न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. प्रयागराजमध्ये अहमद बंधूंना गोळ्या घालून ठार केल्यानंतर तिघांना काही तासांनी दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. अतिकचा मेहुणा आणि चुलत भावाने त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यांना त्यांच्या मूळ गावी दफन केले जाणार आहे.
यापूर्वी, गँगस्टर-राजकारणी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या तीन मारेकऱ्यांचा पहिला फोटो रविवारी समोर आले. अरुण मौर्य, सनी पुराणे आणि लवलेश तिवारी यांना प्रयागराजमध्ये माजी समाजवादी खासदार आणि दोषी गुंड अतिक अहमद आणि त्याच्या भावाला गोळीबार करून ठार मारल्याबद्दल यूपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा - Atiq Ahmed Shot Dead: पत्रकार बनून आले होते हल्लेखोर, गोळीबार करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक)
हल्लेखोरांनी पत्रकार असल्याचे भासवत मीडिया संवादादरम्यान दोन भावांवर गोळ्या झाडल्या. दोघांची हत्या केल्यानंतर, हल्लेखोरांनी "जय श्री राम" च्या घोषणा दिल्या. पोलिसांनी तात्काळ आरोपींना पकडले. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, लवलेश तिवारी, अरुण मौर्य आणि सनी या तिन्ही हल्लेखोरांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, त्यांनी अतिक अहमदची हत्या केली कारण त्यांना प्रसिद्ध व्हायचे होते. हे तिघे अल्पवयीन गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या खळबळजनक हत्याकांडाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय न्यायिक आयोग स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी पोलीस अधिकार्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि सार्वजनिक त्रास होऊ नये म्हणून राज्यात शांतता, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तथापी, उत्तर प्रदेशात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) च्या कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अयोध्या, मऊ, मथुरा आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पोलिसांची गस्त सुरू आहे.