ज्येष्ठ कॉमेडी अभिनेते दिन्यार कॉन्ट्रॅक्टर यांची दुःखद एग्झिट, नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली

नरेंद्र मोदी यांनी देखील दिन्यार यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.

Dinyar Contractor (Photo Credits: Twitter/ ANI)

पद्मश्री (Padmashree) पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ अभिनेते दिन्यार कॉन्ट्रॅक्टर (Dinyar Contractor) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले आहे. दिन्यार हे 79 वर्षाचे असून बऱ्याच काळापासून ते वृद्धपकाळात येणाऱ्या अनेक आजारांनी त्रासलेले होते. आज सकाळी त्यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. आज दुपारी 3.30  वाजता वरळी येथली प्रेयर हॉलमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील दिन्यार यांच्या सोबतचा फोटो ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दिन्यार हे एक अनुभवी व उत्कृष्ठ नट होते, त्यांनी आजवर टीव्ही, नाटक , सिनेमा या माध्यमातून अनेकांना हसवले आहे. त्यांच्या निधनामुळे दुःखी झालेल्या कुटुंबियांना व फॅन्सचे सांत्वन करणारे ट्विट मोदींनी केले आहे.

नरेंद्र मोदी ट्विट

दिन्यार यांचे कलाविश्वातील योगदान पाहता त्यांनी अनेक कॉमेडी भूमिका करत प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे काम केले होते. बाजीगर, 36 चायना टाऊन , खिलाडी, बादशहा या सिनेमातील त्यांच्या भूमिकेला तर सर्वांनी अगदी डोक्यावर घेतलं होतं. यासोबतच दिन्यार यांनी हिंदी व गुजराती रंगभूमीवर देखील एक उत्तम नट म्हणून काम केले आहे. करिअरच्या सुरवातीच्या काळात त्यांनी मॉडेल म्हणून काही वेळ काम केले होते तसेच त्यांच्या नावावर अनेक टीव्ही मालिका देखील गाजल्या होत्या. दिनयार यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. व्यावसायिक रंगभूमीपासून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती.