Actor Ashiesh Roy Passes Away: 'ससुराल सिमर का' फेम आशीष रॉय यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
लॉकडाऊन दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली असून त्या आजारात त्यांचा बळी गेला.
टीव्ही अभिनेता आशीष रॉय (Ashiesh Roy) यांचे किडनी निकामी झाल्याने निधन झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यानंतर आज (मंगळवार, 24 नोव्हेंबर) त्यांचे राहत्या घरी निधन झाले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आज पहाटे सुमारे पावणे 4 वाजता त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. इमारतीच्या चौकीदारने सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. कालपर्यंत ते ठीक होते. परंतु, आज त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या घरातील नोकराने सांगितले.
आशीष रॉय यांची बहिण आणि कुटुंबिय कोलकाता हून आज मुंबईला येतील. त्यानंतर संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. (हिंदी मालिका 'ससुराल सिमर का' मधील बाल कलाकार शिवलेख सिंह याचा अपघातात मृत्यू, जखमींवर उपचार सुरु)
काही महिन्यांपूर्वी आरोग्याच्या तक्रारींमुळे आशीष यांना मुंबईच्या क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उच्च मधुमेह असल्याने त्यांच्या पायात पाणी झाले होते आणि त्याचा परीणाम किडन्यांवर झाला. काही महिने ते डायलिसिसवर होते. त्यानंतर त्यांची आर्थिक स्थितीही कमजोर झाली. मदतीसाठी त्यांनी सोशल मीडियावरही आवाहन केले होते. "24 मे रोजी त्यांच्याकडे मला डिस्चार्ज घ्यायचा आहे परंतु, हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. 2 लाख बिल झाले असून कसेबसे मी पैसे जमवले आहेत," असे ते एका मुलाखतीत म्हणाले होते.
दरम्यान, मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितले होते की, पैशांच्या कमतरतेमुळे त्यांना उपचार थांबावे लागले आहेत. त्यामुळे स्वतःला देवाच्या भरोशावर सोडत आहे. तसंच डायलिसिसवर असलेल्या आशीष यांनी जगण्याची उमेदही सोडली होती.
गेल्या अनेक वर्षांपासून आशीष रॉय यांनी टीव्ही अभिनेते म्हणून ओळख मिळवली होती. 'कुछ रंग प्यार के ऐसी भी', 'ससुराल सिमर का', 'मेरे अंगने में,' 'बा, बहु और बेबी,' 'ब्योमकेश बक्शी' आणि इत्यादी मालिकांमध्ये काम केले होते.