#MeToo : शिल्पा शिंदेचे धक्कादायक वक्तव्य ; इंडस्ट्रीमध्ये बलात्कार होत नाही
पण या मोहिमेवर अभिनेत्री शिल्पा शिंदेने टीका केली आहे.
#MeToo ही चळचळ येत्या काही दिवसात चांगलीच जोर धरु लागली आहे. या मोहिमेअंतर्गत अनेक महिला आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल बोलत आहेत. पण या मोहिमेवर अभिनेत्री शिल्पा शिंदेने टीका केली आहे. #MeToo ही मोहीम हा चक्क मुर्खपणा असल्याचे तिने म्हटले आहे. इंडस्ट्रीमध्ये बलात्कार होत नसतो. जे काही होतं ते संमतीने होतं, असं शिल्पा शिंदेने म्हटलं आहे.
शिल्पा पुढे म्हणाली की, "तुमच्याबरोबर जेव्हा काही चुकीचे घडते त्याचवेळी तुम्ही बोलले पाहिजे. नंतर बोलण्याचा काय फायदा? याला काही अर्थ नाही. असे केल्याने कोणी तुमचे ऐकणार नाही आणि त्यातून नवीन वादाला तोंड फुटेल. बाकी काही नाही. म्हणूनच जेव्हा तुमच्यासोबत काही चुकीचे घडते तेव्हाच बोलायची हिंमत दाखवा."
इंडस्ट्री चांगलीही नाही आणि वाईटही नाही. अशा घटना सर्वच ठिकाणी घडत असतात. म्हणून काय प्रत्येकजण आपल्या इंडस्ट्रीचे नाव बदनाम करत का? समोरच्या व्यक्तीच्या अप्रोचला तुम्ही कसे उत्तर देता यावर सर्व काही अवलंबून आहे. इंडस्ट्री जे होते ते संमतीने होत असल्याने तुम्ही जर काही गोष्टींसाठी तयार नसाल तर विषय तिथेच सोडून द्या, असा सल्ला शिल्पाने दिला.
एका अभिनेत्रीने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या वादानंतर जोरदार सुरु असलेल्या #MeToo मोहिमअंतर्गत इंडस्ट्रीतील अनेक नावाजलेल्या कलाकारांवर आरोप झाले आहेत. चेतन भगत, रजत कपूर, कैलाश खेर, विकास बहल, साजिद खान, आलोक नाथ, सुभाष घई अशा अनेक कलाकारांवर महिलांनी लैगिंक अत्याचार, बलात्काराचे आरोप केले आहेत.