Bigg Boss 14: मराठीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची जान सानूने मागितली महाराष्ट्राची माफी, मनसेने दिला होता 24 तासांचा अल्टीमेटम, Watch Video
या कार्यक्रमातील अन्य स्पर्धक राहुल वैद्य (Rahul Vaidya) याच्याशी वाद करत असताना मराठीबद्दल जान सानूने वादग्रस्त वक्तव्य केले होते.
कलर्स वाहिनीवर सातत्याने वादग्रस्त ठरलेला तितकाच लोकप्रिय झालेल्या बिग बॉस चे 14 (Bigg Boss 14) वे सीजन सध्या सुरु आहे. नेहमीप्रमाणे यंदाही हा सीजन वादग्रस्त ठरला आहे. त्याला कारण आहे या घरातील स्पर्धक जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu). गायक कुमार सानू यांचा मुलगा जान सानू याने मराठी भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे मनसेने कलर्स वाहिनीला 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता. त्यावर कलर्स वाहिनीने लेखी माफी मागितल्यानंतर जान सानू ने देखील कालच्या भागात कन्फेशन रुम मध्ये जाऊन महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली. या कार्यक्रमातील अन्य स्पर्धक राहुल वैद्य (Rahul Vaidya) याच्याशी वाद करत असताना मराठीबद्दल जान सानूने वादग्रस्त वक्तव्य केले होते.
त्यावर मनसे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी मुंबईत तुझे करिअर कसे होतं ते पाहतो. आम्ही मराठी लवकरच तुला थोबाडणार असे सांगितले होते. त्याचबरोबर त्याला आणि वाहिनीला 24 तासांचा अल्टीमेटम दिला होता. त्याचबरोबर शिवसेना खासदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आणि अभिनेते आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांनीही कारवाईची मागणी केली होती. Colors Channel Apologized: बिग बॉस कार्यक्रमात मराठीचा अपमान; शिवसेना, मनसेच्या इशाऱ्यानंतर कलर्स टीव्हीकडून माफीनामा, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
दरम्यान जान कुमार सानूने कालच्या भागात कन्फेशन रुममध्ये जाऊन "मी काही दिवसांपूर्वी नकळत एक चूक केली. त्यामुळे मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे मी सर्वांची माफी मागतो. मराठी भाषिकांना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता" असे सांगितले.
शिवसेना खासदार प्रताप सरकनाईक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, 'Big Boss मालिकेचे शूटिंग महाराष्ट्रात होते, मराठी लोकांमुळे TRP वाढतो त्याच महाराष्ट्राच्या मराठीचा अवमान मालिकेतल्या जान कुमार सानूने केला हे कदापि खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात करियर घडवलेल्या गायक कुमार सानुचा मुलगा मराठीचा द्वेष व अनादर करत असेल तर हे सहन केले जाणार नाही'. एकूणच राजकीय हस्तक्षेपानंतर जान सानूला नरमला असल्याचे चित्र दिसून येत आहे.