Agabai Sunbai Promo (Photo Credits: Facebook)

झी मराठी (Zee Marathi) वरील 'अग्गंबाई सासूबाई' (Agga Bai Sasubai) मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मात्र चाहत्यांना नाराज होण्याचे कारण नाही. आसावरी-अभिजीत आणि सोहम-शुभ्रा यांच्या संसाराचा पुढील प्रवास प्रेक्षकांना नव्या कथेत पाहायला मिळणार आहे. 'अग्गंबाई सूनबाई' (Agabai Sunbai) या नव्या नावाने नवी मालिका  15 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता या नव्या मालिकेचा आस्वाद तुम्हाला घेता येईल. विशेष म्हणजे या नव्या मालिकेचा प्रोमो (Promo) रिलीज झाला आहे.

प्रोमोत तुम्ही पाहू शकाल की, अभिजीत राजे स्वयंपाकघरात काम करत असून आसावरी मोठी उद्योजिका झाली आहे. ती मिटींगमध्ये असताना अभिजीत तिला फोन करुन प्रश्नांचा भडिमार करतो. तेव्हा ती 'मीटींगमध्ये आहे', इतकंच सांगते. मागून शुभ्रा कडेवर बाळाला घेऊन येते आणि 'संसार करणं सोप्पं नसतं', असं म्हणते. त्यावर अभिजीत 'खरंय' असं म्हणतो.

पहा प्रोमो:

अभिजीत-आसावरी म्हणून गिरीश ओक आणि निवेदीता सराफ दिसत असले तरी प्रोमोत शुभ्रा च्या भूमिकेत नवा चेहरा दिसत आहे. त्याचबरोबर नवी कथा नेमकी कशी असणार, याबद्दलची उत्सुकता आता प्रोमोमुळे वाढली आहे. (‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेची टिंगल उडवणाऱ्या लोकांवर भडकले गिरीश ओक; म्हणाले- ‘तुमच्यासाठी जीवावर उदार होऊन शुटींगला जातो’, झाले ट्रोल)

'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका जुलै 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि अल्पावधीतच लोकप्रिय झाली. त्यामुळे नव्या मालिकेकडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. दरम्यान, 'अग्गंबाई सूनबाई' ही मालिका तितकीच लोकप्रियता मिळवणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.