पैसे थकवणाऱ्या लोकांवर भडकली अभिनेत्री हेमांगी कवी; 'पैशांसाठी सतत फोन करायचे, मेसेजेस करायचे...', See Post

लॉकडाऊनमध्ये उद्योग बंद, कामे बंद, यामुळे अनेकांची फरपट झाली. चित्रपट व मालिका क्षेत्रातील लोकांचीही काही वेगळी अवस्था नाही. गेले तीन महिने शुटींग बंद होते

हेमांगी कवी (Photo Credit : Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) साथीच्या महामारीमुळे सामान्य जनतेची सर्वच गणिते कोलमडून गेली आहेत. लॉकडाऊनमध्ये उद्योग बंद, कामे बंद, यामुळे अनेकांची फरपट झाली. चित्रपट व मालिका क्षेत्रातील लोकांचीही काही वेगळी अवस्था नाही. गेले तीन महिने शुटींग बंद होते, त्यानंतर आता नियमांसह शुटींगला परवानगी मिळाली आहे. मात्र थकलेल्या पैशांबाबत परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. अशाच पैसे थकवणाऱ्या लोकांवर अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) भडकली आहे. फेसबुक पोस्टद्वारे तिने आपला संताप व्यक्त केला आहे. कलाकारांना कामाचे पैसे 90 दिवसांनंतर मिळतात. गेले 100 शंभर दिवस काम नाही, त्यात आता या 90 दिवसांची भर, या पद्धतीवर अभिनेत्री हेमांगी कवीने सडकून टीका केली आहे.

आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘बऱ्याच मालिकांचे शुटींग सुरु झाले आहे, मात्र ते 90 दिवस क्रेडीटचे भूत अजूनही मानगुटीवर आहे. आधीच 100 दिवस काम नाही त्याचे पैसे नाही आणि आता काम सुरू होऊन त्यात ही 100 दिवसांची भर. म्हणजे 365 पैकी 200 दिवस पैसे मिळणार नाहीत. अशात कर्ज घेतलेल्या बँकेचे फाप्ते कसे फेडायचे, विमा पॉलिसीचे हप्ते कसे भरायचे? महत्वाचे म्हणजे घरात दोघेही याच क्षेत्रात काम करत असतील त्यांचे काय?’ असा सवाल हेमांगीने उपस्थित केला आहे.

पहा पोस्ट - 

पुढे तिने पैसे थकवणाऱ्या लोकांवर भाष्य केले आहे. ती म्हणते. ‘या उरलेल्या 165 दिवसांमध्ये कामाच्या पैशांसाठी सतत फोन करायचे, मेसेज करायचे... आज ...उद्या... या आठवड्यात करत करत अजून किती दिवस जाणार माहीत नाही! कलाकार आणि तंत्रज्ञ लोकांकडून पूर्ण पाठींबा हवा, मात्र कामाच्या मानधनाच्या बाबतीत आम्ही अजिबात अपेक्षा करायची नाही!’ (हेही वाचा: अभिनेत्री पायल रोहतगीचे ट्विटर अकाऊंट झाले सस्पेंड; सलमान खानने हे घडवल्याचा आरोप)

मुख्य म्हणजे या 90 दिवसांनंतरच्या पैशाबाबत करारामध्ये नमूद केले असते, ज्या लोकांना हा मुद्दा पटतो ते काम करतात, ज्यांना नाही ते अजून 100 काय 365 दिवस घरात बसून काढतील. या तयार होणाऱ्या करारावर हेमांगीने आक्षेप घेतला आहे. पुढचे काही महिने तरी 30 दिवसांचे क्रेडीट ठेवायचे, अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे.