'कोरोनापेक्षा देशाला लागलेली घातक कीड म्हणजे 'राजकारण', अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने सोशल मिडियाद्वारे व्यक्त केली चीड
यात तिने देशातील घाणेरड्या राजकारणावर भाष्य केले आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाची दुसरी लाट आली असून यात अनेकांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. अशी परिस्थिती असताना दुसरीकडे देशातील राजकारण देखील दिवसेंदिवस विकोपाला जात आहे. औषधे, ऑक्सिजन यांचा अपुरा पुरवठा, यामध्ये होत असलेले राजकारण हे लोकांना उघडरित्या दिसत आहे. या सर्वांवर टिप्पणी करत मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर खास पोस्ट शेअर केली आहे. यात तिने देशातील घाणेरड्या राजकारणावर भाष्य केले आहे.
आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे की, "सगळ्यात मोठी “कीड” जर आपल्या देशाला, आपल्याच नाही, तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे “राजकारण”…ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या “कीड”पासून बचाव करता आला तर बघा! ..अवघड आहे सगळंच…काळजी घ्या."हेदेखील वाचा- IPL वरुन भडकली राखी सावंत, मुंबईत लोकांचा मृत्यू होतोय तरीही येथे आयपीएल खेळवली जातेय
थोडक्यात तेजस्विनीने देशातील राजकारणाविषयी आपल्या मनातील राग, चीड व्यक्त केली आहे. यापूर्वीही अनेक कलाकारांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. दरम्यान अभिनेता संदीप पाठकनेही यानेही "महाराष्ट्रात रुग्णसंख्या जास्त असताना लसींचा पुरवठा कमी का?'' असा सवाल त्याने उपस्थित केला होता.
महाराष्ट्रात मागील 24 तासांत 68,631 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 503 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण 38 लाख 39 हजार 338 वर पोहोचली आहेत. तर मृतांची एकूण संख्या 60 हजार 473 वर पोहोचली आहे.