Bali Teaser: तुमचा थरकाप उडवण्यासाठी येतोय स्वप्नील जोशी याचा आगामी चित्रपट 'बळी', टीझर पाहून व्हाल हैराण (Video)
चित्रपटाचा पोस्टर रिलिज केल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल जोरदार चर्चा सुरु झाली होती.
Bali Teaser Released: मराठमोळा अभिनेता स्वप्निल जोशी याचा आगामी हॉरर चित्रपट बळी याचा टीझर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. चित्रपटाचा पोस्टर रिलिज केल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल जोरदार चर्चा सुरु झाली होती. प्रदर्शित करण्यात आलेल्या टीझरच्या सुरुवातीलाच एका आईचा दबका आवाज आपल्याला ऐकू येतो. ती कोणाच्या तरी मुलाला हाक मारत असल्याचे भासते. त्याचवेळी अभिनेता स्वप्नील जोशी एका पडक्या वाडारुपी रुग्णालयात कोणाला तरी शोधत असल्याचे दिसून येते. तेव्हा पाठून मी इथेच आहे मुला असा आईचा आवाज ऐकू येतो. त्यानंतर एलिझाबेथ अशी हाक ही येते आणि पुन्हा आई म्हणते घाबरु नकोस.
अवघ्या काही सेकंदाच्या या टीझरमधून मनात एक भीती निर्माण होते हे नक्कीच. त्याचसोबत एलिझाबेथ नक्की कोण आहे आणि तिचा त्या आईशी नेमका काय संबंध असे प्रश्न सुद्धा मनात उद्भवतात. तर दुसऱ्या बाजूला स्वप्निल जोशी नक्की कोणाला तेथे शोधत असतो? अशा विविध प्रश्नांची कोडी सोडवण्यासाठी हा सिनेमा आपल्याला नक्कीच पहावा लागणार आहे.
'बळी' सिनेमा अर्जुन सिंघ बारण आणि कार्तिक डी निशंदर यांच्या ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट आणि मीडिया सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. तर येत्या 16 एप्रिल रोजी सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.