लोकसभा निवडणूक 2019 च्या प्रचारादरम्यान नाना पाटेकर यांच्या फोटोंचा गैरवापर; ट्विट करुन नानांचा खुलासा
सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे.
देशभरात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. रॅली, भाषणे, दौरे याद्वारे प्रचार करण्यात येत आहे. त्याचबरोबर यंदा ऑनलाईन प्रचारही जोरदार सुरु आहे. या सगळ्यात सेलिब्रेटी, स्टार मंडळी यांची राजकीय पक्षांना साथ लाभत आहे. यातच अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या नावानेही अनेक मेसेज व्हायरल होताना दिसत आहे. यावर खुद्द नानांनी ट्विट करत खुलासा केला आहे.
नानांनी ट्विट करत लिहिले की, "नाम फाऊंडेशनच्या कामा निमित्त गावोगावी फिरताना अनेक लोक भेटायला येतात आणि पुष्पगुच्छ देऊन फोटो काढतात. काही मंडळी अशा फोटोंचा गैरवापर करीत आहेत. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही. कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही."
नाना पाटेकर यांचे ट्विट:
निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर अनेकदा चुकीची माहिती फिरत असते. मात्र अनेकजण याला बळी पडतात. त्यामुळे अशा प्रकारच्या खोट्या प्रचार आणि माहितीपासून दूर राहावे, असे आवाहन नाना पाटेकरांनी केले आहे.