अखेर Sony TV ला आली जाग; 'छत्रपती शिवाजी महाराज' यांच्या नावाचा अपमान केल्या प्रकरणी ने मागितली माफी

आपली चूक मान्य करत माफी मागितली आहे.

Amitabh Bachchan (Photo Credits: Instagram)

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान आणि सोबतच एक हळवा कोपरासुद्धा. त्यामुळे जेव्हा सोनी टीव्ही (Sony TV) वरील प्रतिष्ठित कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमात छत्रपतींचा उल्लेख एकेरी नावाने करण्यात आला तेव्हा समस्त महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या गेल्या. इतकंच नव्हे तर देशभरातूनही त्यावर टीकेची झोड उठली. आता सोनी वाहिनीने घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. आपली चूक मान्य करत माफी मागितली आहे.

सोनी वाहिनीने केलेल्या या अक्षम्य चुकीनंतर संपूर्ण दिवस ट्विटरवर 'बॉयकॉट केबीसी सोनीटीव्ही' हा हॅशटॅग जोर धरत होता. सबंध देशातील जनतेने सोनीवर ताशेरे ओढले होते. याची दखल घेणे सोनीला भाग पडले. त्यांनी लगेच त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करत, 'बुधवारच्या भागात अजाणतेपणी आमच्याकडून चूक घडून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख तसा केला गेला. त्याबद्दल आम्ही दिलगीर असून आम्हाला आमच्या चाहत्यांच्या भावनांची कदर आहे. म्हणूनच आम्ही कालच्या भागात एका स्क्रोल मधून केला आहे.' (हेही वाचा. 'छत्रपती शिवाजी महाराजां'चा उल्लेख फक्त 'शिवाजी' असा केल्यामुळे Kaun Banega Crorepati आणि Sony TV वर होत आहे बहिष्काराची मागणी)

आता सोनीने छोट्याश्या स्क्रोल मधून मागितलेली ही माफी प्रेक्षकांच्या दुखावलेल्या भावनांवर कितपत मलमपट्टी करते हा प्रश्न आहे. औरंगजेबासारख्या व्यक्तीचा उल्लेख अदबीने घेतला जातो आणि छत्रपतींचा मात्र एकेरी ही सल त्या छोट्याशा स्क्रोल मधून भरून निघणार का, की जोवर सोनी मोठ्या मंचावर या प्रकरणाबद्दल माफी मागत नाही तोवर प्रेक्षक नाराजच राहणार हाच सवाल आहे.