राम गणेश गडकरी लिखीत 'एकच प्याला' नाटक पुन्हा एकदा नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला
दारूच्या एका प्यालामुळे आजही अनेक तरुणांच्या आयुष्याची आणि पर्यायाने त्यांच्या संसारांची दुरावस्था होत आहे, त्यामुळे आजही तितक्याच ज्वलंत असलेल्या विषयावरील ह्या दर्जेदार नाटकाचे मायबाप रसिक स्वागत करतील अशी अपेक्षा आहे
मराठी नाट्यसृष्टीतील अजरामर नाटकांपैकी एक असलेले, आणि गेली अनेक दशकं मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेले नााटक म्हणजेच 'एकच प्याला' (Ekach Pyala Play). श्रेष्ठ नाटककार राम गणेश गडकरी (Ram Ganesh Gadkari) यांनी इ.स. १९१७ मध्ये लिहिलेले हे नाटक आता पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येत आहे. अंशुमन विचारे (Anshuman Vichare), संग्राम समेळ आणि संपदा माने या आजच्या कलाकारांची फळी 'संगीत एकच प्याला' नाटकातून आपल्या भेटीला येत आहे. येत्या 11 मे रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग आचार्य अत्रे नाट्यगृह(Acharya Pralhad Keshav Atre RangMandir), कल्याण ( Kalyan) येथे सादर होत आहे. मद्यपान व त्याचे दुष्परिणाम हा विषय असलेल्या या नाटकातील तळीराम, सुधाकर आणि सिंधू ही प्रमुख पात्र, प्रसिद्ध अभिनेते विजय गोखले यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याद्वारे रंगभूमीवर अजरामर ठरलेले हे नाटक नव्या ढंगात पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे
परिणामकारक नाट्य आणि सादरीकरण या बळावर थोडीथोडकी नव्हेत तर रंगभूमीवर १०० वर्षे राज्य गाजवणारे हे नाटक शताब्दीवर्षपूर्तीचे औचित्य साधून, रसिकांच्या भेटीला येत आहे. या संगीत नाटकातील सुधाकरची भूमिका अभिनेता संग्राम समेळ करीत असून, सिंधूची भूमिका गुणी अभिनेत्री संपदा माने साकारत आहे. शिवाय 'तळीराम' ही राजा गोसावी, चित्तरंजन कोल्हटकर, जयंत सावरकर अशा दिग्गजांनी सजवलेली भूमिका अभिनेता अंशूमन विचारे करत आहे. तसेच अन्य भूमिकांतही शुभांगी भुजबळ, शुभम जोशी, मकरंद पाध्ये, शशिकांत दळवी, विजय सूर्यवंशी, दीपक गोडबोले, विक्रम दगडे, रोहन सुर्वे, प्रवीण दळवी अशा गुणी कलाकारांची उपस्थिती आहे. (हेही वाचा, 'दहा बाय दहा' नाटकाद्वारे विजय पाटकर, प्रथमेश परब मराठी रंगभूमीवर देणार विनोदाची फोडणी)
नवीन पद्धतीच्या सादरीकरणाबरोबरच पारंपारिकतेचे साज चढवलेल्या या नाटकाचे नेपथ्य आघाडीचे नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी केले आहे. तर, ज्येष्ठ संगीतकार अरविंद पिळगांवकर यांचे संगीत मार्गदर्शन लाभले असून, त्यांना केदार भागवत आणि सुहास चितळे यांची संगीत साथ आहे. सुत्रधार गोट्या सावंत व कार्यकारी निर्माती सौ.सविता गोखले आहेत.
दारूच्या एका प्यालामुळे आजही अनेक तरुणांच्या आयुष्याची आणि पर्यायाने त्यांच्या संसारांची दुरावस्था होत आहे, त्यामुळे आजही तितक्याच ज्वलंत असलेल्या विषयावरील ह्या दर्जेदार नाटकाचे मायबाप रसिक स्वागत करतील अशी अपेक्षा आहे