Diwali 2018 : दिवाळीच्या विकेंडला रसिकांसाठी नाटक, सिनेमे, लाईव्ह शो कार्यक्रमांची मेजवानी !
यंदाची दिवाळी अधिक सुरेल, प्रसन्न आणि आनंदी करण्यासाठी या कलाकृती रसिकांच्या भेटीला येत आहेत.
दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा, रोषणाईचा आणि झगमगाटाचा सण. दिवाळी म्हणजे पणत्या, रांगोळी, कंदील, फराळ, फटाके आणि सुट्ट्या. तसंच दिवाळीत अजून एक आकर्षक असतं ते म्हणजे दिवाळी पहाट कार्यक्रमांचं. त्याचबरोबर दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेक सिनेमे, नाटकं प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होतात.
तर मग यंदाची दिवाळी अधिक सुरेल, प्रसन्न आणि आनंदी करण्यासाठी या कलाकृती रसिकांच्या भेटीला येत आहेत.
सिनेमे
....आणि डॉ. काशिनाथ घाणेकर
यंदा दिवाळीत सुबोध भावेचा '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातून नाट्यसृष्टीतील पहिले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनपट रुपेरी पडद्यावर उलघडला जाणार आहे. हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 8 नोव्हेंबरला सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. सुबोध भावेशिवाय प्रसाद ओक, सुमीत राघवन, सोनाली कुलकर्णी हे कलाकार या सिनेमात दिग्गजांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
ठग्स ऑफ हिंदोस्तान
ठग्स ऑफ हिंदोस्तान या सिनेमातून अमिताभ बच्चन आणि आमिर खान ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. हा सिनेमाचा ट्रेलरला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले असून सिनेमाची गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहेत. हा सिनेमा देखील दिवाळीच्या दिवशी 8 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. यात कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
नाटकं
नटसम्राट
नटसम्राट ही अजरामर कलाकृती पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार आहे. नाटक सिनेमा नाटक असा या शोकांतिकेचा प्रवास असून यंदा दिवाळीचा मुहूर्त साधत हे नाटक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे. वि.वा शिरवाडकर लिखित नटसम्राट ही कलाकृती हृषिकेश जोशी दिग्दर्शित करणार आहे. यात मोहन जोशी अप्पा बेलवणकरांच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय रोहिणी हट्टंगडी, सुशील इनामदार, भक्ती देसाई, शुभांकर तावडे, अभिजीत झुंझारराव यांसारखे कलाकार या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत. 4 नोव्हेंबरपासून हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चल, तुझी सीट पक्की !
नाटकमंडळी रसिकांच्या भेटीला येऊन येत आहेत 'चल, तुझी सीट पक्की !' हे नवंकोरं नाटक. मंगेश कदम, लीना भागवत आणि शरद पोंक्षे यांच्या अभिनयाने सजलेलं हे नाटक 9 नोव्हेंबरपासून रसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.
संगीतप्रेमींची दिवाळी ही दिवाळी पहाट कार्यक्रमाशिवाय अपूर्णच. तर यंदाही रसिकांच्या मनोरंजनासाठी दर्जेदार दिवाळी पहाट कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. जाणून घेऊया त्याविषयी...
अलिकडे भाडिपा या युट्युब चॅनलने तरुणाईच्या मनाचा ठाव घेतला आहे. यंदा दिवाळीतही तुम्हाला भाडिपासोबत साजरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
दिवाळी पहाट कार्यक्रम
दिवाळी पहाट विथ भाडिपा
पु.ल.च्या शतकोत्सवी वर्षानिमित्त 'भाडिपाचे वल्ली' हा खास कार्यक्रम भाडिपा रसिकांसाठी घेऊन येत आहे. 8 नोव्हेंबर, सकाळी 8 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह,दादर, मुंबई येथे या कार्यक्रमाचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता.
स्वर दीपावली
ऋषिकेश रानडे, मधुरा दातार यांच्या सुरांनी सजलेला स्वर दीपावली हा कार्यक्रम पुण्यात पार पडणार आहे. 4 नोव्हेंबर, सकाळी 6 वाजता बालगंधर्व रंगमंदिर पूणे येथे तर 5 नोव्हेंबर, सकाळी 6 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पूणे येथे तुम्ही या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकता.
रंगात रंगली दिवाळी
गाणी, गप्पा, किस्से यांची संगीतमय दिवाळी पहाट अनुभवायची असल्यास या ठिकाणी भेट देऊ शकता.
गडकरी रंगायतन- 7 नोव्हेंबर- सकाळी 6:30
विष्णुदास भावे वाशी- 6 नोव्हेंबर- सकाळी 7
महाकाली कालिदास नाट्यमंदिर- 8 नोव्हेंबर- सकाळी 6:30
प्रबोधनकार ठाकरे ऑडिटोरियम- 9 नोव्हेंबर- 6:30
दिवाळी पहाट- चित्ररंग
आनंदी जोशी, चैतन्य कुलकर्णी यांच्या सुरेल आजावात दिवाळीची सुरुवात करायची असल्यास 7 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजता विष्णुदास भावे, वाशी येथे भेट देता येईल.
दिवाळी पहाट- महेश काळे
प्रचंड चाहतावर्ग असलेला महेश काळे यंदा ठाणेकरांची दिवाळी पहाट सुरेल करण्यासाठी सज्ज झाला आहे. 8 नोव्हेंबरला सकाळी 6:45 मिनिटांनी महेशचा कार्यक्रम शिव समर्थ सेवक मंडळाच्या पटांगणावर पार पडणार आहे.