सुशांत सिंह राजपूत आमच्या मुलासारखा होता, मी त्याच्या कुटूंबाला धमकावले नाही- संजय राऊत
'आमची सर्व सहानुभूती सुशांतच्या कुटूंबासोबत आहे. मी केवळ त्यांनी थोडा संयम बाळगावा असे म्हणाले होतो. मुंबई पोलिस चांगले काम करत असून त्यांच्यावर त्यांनी विश्वास दाखवावा असे मी म्हणालो' असेही ते म्हणाले.
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यूमागचे सत्य लवकरात लवकर समोर यावे असे प्रत्येकाला वाटत आहे. यासाठी हा तपास CBI कडे देण्यात यावा अशी मागणी त्याच्या कुटूंबियांसह त्याच्या सर्व चाहत्यांकडून होत आहे. मात्र यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिशाभूल करणारे वक्तव्य करुन त्याच्या कुटूंबियांबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे त्यांनी आपली माफी मागावी अशी मागणी त्याच्या कुटूंबियांनी केली होती. त्यावर भाष्य करत सुशांत सिंह राजपूत च्या मृत्यूमागचे गूढ समोर यावे असे आम्हालाही वाटते असे संजय राऊत म्हणाले आहेत.
ANI शी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 'आमची सर्व सहानुभूती सुशांतच्या कुटूंबासोबत आहे. मी केवळ त्यांनी थोडा संयम बाळगावा असे म्हणाले होतो. मुंबई पोलिस चांगले काम करत असून त्यांच्यावर त्यांनी विश्वास दाखवावा असे मी म्हणालो' असेही ते म्हणाले.
'जर तुम्हाला वाटत असेल की ते चांगले काम करत नाही तर तुम्ही नक्कीच CBI कडे जाऊ शकता. सुशांत हा आमच्या मुलासारखा होता. त्यामुळे त्यांच्या कुटूंबाला न्याय मिळावा आणि सुशांतच्या मृत्यूमागचे गूढ समोर यावे असे आम्हालाही वाटत आहे.' असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान‘सुशांतच्या वडिलांनी दोन लग्ने केली होती, याचा सुशांतला त्रास झाला, हे संजय राऊत यांचे वक्तव्य पूर्णतः खोटे आहे. या प्रकरणाशी संबंधित दिशाभूल करणारी तथ्ये पसरवणे हा एक सुनियोजित कट आहे. काही लोकांना या प्रकरणाचा छडा लागावा असे वाटत नाही. संजय राऊत हे एक जबाबदार नेते आहेत, त्यांच्याकडून असे वक्यव्य अपेक्षित नाही असे आमदार नीरजकुमार बबलू म्हणाले आहेत. संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वादग्रस्त विधानावर सुशांतच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.