Tandav Controversy: 'तांडव' वेब सीरिजबाबतचा वाद चिघळला; निर्माते आणि अभिनेत्यांविरोधात मुंबईमध्ये FIR दाखल

निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांविरूद्ध आयपीसी कलम 153 (ए) 295 (ए) 505 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Tandav poster (Photo Credit: Twitter)

नुकतीच रिलीज झालेली अली अब्बास जफरची (Ali Abbas Zafar) वेब सिरीज ‘तांडव’ (Tandav) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या सिरीजसंदर्भात इतका मोठा वाद निर्माण झाला आहे की, 6 ठिकाणी एफआयआर नोंदविण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे माहिती प्रसारण मंत्रालयानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. आता माहिती मिळत आहे की, तांडव वेब सिरीजबाबत मुंबईच्या (Mumbai) घाटकोपर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर (FIR) नोंदविण्यात आला आहे. निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांविरूद्ध आयपीसी कलम 153 (ए) 295 (ए) 505 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचे आमदार राम कदम यांच्या तक्रारीवरून हा एफआयआर नोंदविण्यात आला आहे. यामध्ये धार्मिक भावना भडकवल्याचा, समाजात द्वेष पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये सैफ अली खान, झीशान अयूब, अली अब्बास जफर, हिमांशु मेहरा, गौरव सोलंकी, अपर्णा पुरोहित, अमित अग्रवाल आणि वेब सीरिजच्या अन्य कलाकारांची नावे आहेत.

दुसरीकडे, तांडवविरोधात उत्तर प्रदेशमध्ये नोंदवलेल्या एफआयआर बाबत उत्तर प्रदेश पोलिसांचे चार कर्मचारी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. अनिल कुमार सिंह आणि दयाशंकर दुबे हे मुंबई पोलिसांची परवानगी घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. या संपूर्ण वादावर आज तकशी बोलताना एडीजी प्रशांत कुमार यांनी स्पष्ट केले आहे की, धार्मिक भावना दुखावण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्याचबरोबर, त्यांनी असेही म्हटले आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यावरच निष्कर्ष काढला जाईल.

ते पुढे म्हणाले, ‘या सिरीजविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि त्या एफआयआरमध्ये काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश पोलिस या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईला गेले आहेत.' (हेही वाचा: Mirzapur Controversy: Tandav नंतर आता Amazon Prime ची मिर्झापूर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; मेकर्सविरुद्ध FIR दाखल)

दरम्यान, दिग्दर्शक अली अब्बाज जफरने सोशल मीडियावर स्पष्ट केले आहे की, या वेब सीरिजची कथा पूर्णपणे काल्पनिक आहे आणि त्यांच्या टीमचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. इतकेच नव्हे तर तांडवमधून प्रत्येक विवादित सीन हटविण्यासाठी मेकर्स तयार असल्याचे त्याने सांगितले होते.