अखेर 2 वर्षानंतर श्रीदेवी यांच्या मृत्यूचे खरे कारण आले समोर; वाचा सविस्तर
अखेर श्रीदेवी यांच्या मृत्यूच्या सुमारे दोन वर्षांनंतर, त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले आहे. बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सर्वांनाच माहित आहे
Sridevi Death Reason: बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू झाला आहे यावर आजही त्यांच्या चाहत्यांचा विश्वास बसत नाही. अखेर श्रीदेवी यांच्या मृत्यूच्या सुमारे दोन वर्षांनंतर, त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले आहे. बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सर्वांनाच माहित आहे परंतु, त्यांच्या मृत्यू मागील आणखी एक गूढ समोर आलं आहे. श्रीदेवींच्या जीवनावर आधारित ‘श्रीदेवी : द एटर्नल गॉडेस’ हे पुस्तक लिहिणारे लेखक सत्यार्थ नायक यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.
सत्यार्थ नायक यांनी असा खुलासा केला आहे की, 'श्रीदेवी या बर्याचदा कमी रक्तदाबामुळे बेशुद्ध होत असत.' यावर त्यांनी श्रीदेवीच्या जवळच्या अनेक लोकांच्या वक्तव्यांचा समावेशही केला. बिझिनेस टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार नुकतेच सत्यार्थ नायक यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, "पंकज पराशर (ज्यांनी श्रीदेवी यांच्या चालबाज चित्रपटाचे दिग्दर्शन केले) आणि नागार्जुन यांची भेट घेतली. त्या दोघांनी मला सांगितले की त्यांना कमी रक्तदाबाचा त्रास होता. या दोघांसोबत काम करत असताना श्रीदेवी अनेक वेळा बाथरूममध्ये बेशुद्ध झाल्या आहेत. मग या प्रकरणात मला श्रीदेवी यांची भाची माहेश्वरी भेटली. तिने मला असेही सांगितले की तिला एकदा श्रीदेवी बाथरूम जवळ पडलेल्या आढळल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरून रक्तस्त्राव होत होता. बोनी सरांनी मला असेही सांगितले की एक दिवस अशा प्रकारे धावताना श्री देवी अचानक खाली पडल्या. मी म्हटल्याप्रमाणे त्या कमी रक्तदाबाच्या आजाराशी झगडत होत्या."
याआधीही श्रीदेवी यांच्या निधनानंतर केरळमधील एका डीजीपीने त्यांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ते म्हणाले होते की, 'श्रीदेवींचा मृत्यू हा अपघात नव्हे तर खून होता.' दरम्यान, श्रीदेवीचे यांचे 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईमधील एका हॉटेलमध्ये निधन झाले. श्रीदेवी त्यांच्या पतीला हॉटेल रूमच्या बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडल्या होत्या.