Sonu Sood Felicitated by GCOT: गरीब-गरजूंना केलेल्या मदतीसाठी सोनू सूद याचा 'ग्रामोदय बंधू मित्र पुरस्कार' देवून सन्मान

यासाठी ग्रामोदय चेंबर ऑफ कॉमर्स अँड टेक्नोलॉजी तर्फे ग्रामोदय बंधु मित्र पुरस्कार देऊन त्याला सन्मानित करण्यात आले.

Sonu Sood (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने कोविड-19 लॉकडाऊन (Covid-19 Lockdown) काळात गरीब-गरजू यांना सढळ हस्ते मदत केली. त्यानंतर त्याच्याकडे मदत मागणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या सर्वांना मदतीचा हात पुढे करणाऱ्या सोनू सूद याला ग्रामोदय चेंबर ऑफ कॉमर्स अँड टेक्नोलॉजी (Gramodaya Chamber of Commerce and Technology) तर्फे ग्रामोदय बंधु मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तीन दिवस व्हर्च्युअल माध्यमातून सुरु असलेल्या GCOT पुरस्कार सोहळ्याच्या पहिल्या दिवशी सोनू सूद याचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. दरम्यान, या सोहळ्याचे उद्घाटन तेलंगना विधान परिषदेचे अध्यक्ष गुथा सुखेन्द्र रेड्डी यांनी केले होते.

शक्ति अन्नदानम अभियानाद्वारे माझे मदतकार्य अखंड सुरु राहील, असे आश्वासन यावेळी सोनू सूद याने दिले. जीसीओटीचे कार्यकारी अध्यक्ष वसंत कुमार दामस्थपुरम यांनी सांगितले की, कोविड-19 लॉकडाऊन काळात सोनू सूद याने शेकडो स्थलांतरीत मजूरांना सुरक्षितरीत्या स्वगृही पाठवण्यासाठी मदत केली. दरम्यान, या व्हर्च्युअल कन्वेंशनचे आयोजन महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंती निमित्त करण्यात आले होते. महात्मा गांधींनी देखील गावांच्या विकासावर भर देत 'खेड्यांकडे चला' असा संदेश दिला होता.

सोनू सूद याने केलेल्या मदतकार्यासाठी त्याला युनाईटेड नेशन डेवलपमेंट प्रोग्रॅम (यूएनडीपी) च्या एसडीजी स्पेशल ह्युमॅनेटेरियन अॅक्शन अवॉर्डने गौरवण्यात आले होते. तसंच अनेक स्तरातून सोनू सूद याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळण्यासाठी सोनू सूद करणार मदत; आईच्या नावाने लॉन्च केली स्कॉलरशिप)

दरम्यान, कोविड-19 लॉकडाऊन काळात सोनू सूद याने स्थलांतरीत मजूरांना घरी पाठवण्यासाठी बसेसची सोय केली होती. त्यानंतर निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला. कोरोना व्हायरस संकट काळात होणाऱ्या परीक्षांसाठी मदत करण्याचे आश्वासनही त्याने परीक्षार्थींना दिले होते. विशेष म्हणजे सोनू सूद याने आपल्या आईच्या नावाने विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरु केली आहे. याद्वारे गरजू-गरीब मुलांना मोफत शिक्षण घेता येणे शक्य होणार आहे.