S. P. Balasubrahmanyam Health Update: गायक एस पी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती अत्यंत गंभीर; सध्या ECMO वर असल्याची रुग्णालयाची माहिती

त्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी माहिती मिळाली होती की, त्यांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे,

S P Balasubrahmanyam (PC - Facebook)

गायक एस पी बालासुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांना कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाल्यांनतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी माहिती मिळाली होती की, त्यांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. बालासुब्रमण्यम यांना 5 ऑगस्ट रोजी चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेअर रुग्णालयात दाखल केले होते. आता रुग्णालयाने माहिती दिली आहे की, त्यांची प्रकृती गेल्या 24 तासांत पुन्हा बिघडली असून सध्या ते अत्यंत गंभीर अवस्थेत आहेत. याबाबत रुग्णालयाने एक निवेदन जारी केले आहे.

या निवेदनामध्ये रुग्णालयाने म्हटले आहे की, ‘एस पी बालासुब्रमण्यम यांना 5 ऑगस्ट रोजी एमजीएम हेल्थकेअर येथे दाखल करण्यात आले होते. अजूनही ते ईसीएमओ आणि इतर लाईफ सपोर्ट गोष्टींवर आहेत. गेल्या 24 तासांत त्यांची स्थिती अजून बिघडली असून त्यांना जास्तीत जास्त लाइफ सपोर्टची गरज आहे. एमजीएम हेल्थकेअरमधील तज्ञांची टीम त्यांच्या आरोग्याच्या स्थितीवर बारीक नजर ठेवून आहे.’ अनुराधा भास्करन, सहाय्यक संचालक वैद्यकीय सेवा, एमजीएम हेल्थकेअर यांनी हे निवेदन जारी केले आहे.

पहा एएनआय ट्वीट -

गायक बालासुब्रमण्यम यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर 5 ऑगस्टला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले. आता त्यांची प्रकृती अजून गंभीर झाली आहे. इलायाराजा, रजनीकांत, कमल हासन, ए.आर. रहमान यांच्यासह जगभरातील ख्यातनाम व्यक्ती आणि चाहते यांनी गायकाच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना केली आहे. (हेही वाचा: ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन)

दरम्यान, एस पी बालासुब्रमण्यम यांनी तेलगू, तामिळ, कन्नड, हिंदी, मल्याळम अशा चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी 16 भारतीय भाषांमध्ये 40,000 पेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड केली आहेत. बालासुब्रमण्यम यांना त्यांच्या उत्कृष्ट गायकी कारकीर्दीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.