निर्भया गँगरेप प्रकरणातील दोषींच्या फाशीवर अभिनेता रितेश देशमुख याने ट्विट करत व्यक्त केल्या भावना

7 वर्षांच्या लढ्याला अखेर न्याय मिळाला आहे. अभिनेता रितेश देशमुख याने देखील आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

Riteish Deshmukh (Photo Credits: Instagram)

दिल्ली येथे 2012 साली झालेल्या निर्भया गँगरेप आणि हत्या प्रकरणारतील दोषींना आज फासावर लटकवण्यात आले. 7 वर्षांच्या लढ्याला अखेर न्याय मिळाला आहे. तिहार जेलमध्ये दोषी विनय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता आणि मुकेश यांना आज सकाळी 5:30 वाजता फाशी देण्यात आली. त्यानंतर निर्भयाची आई, वडील आणि वकील यांनी विजयोत्सव साजरा केला. तर दोषींना झालेल्या शिक्षेमुळे संपूर्ण देशातून समाधान व्यक्त केले जात आहे. तसंच राजकीय नेते, सेलिब्रेटी यांनी देखील सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने देखील आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. (निर्भयाच्या आरोपींना अखेर फाशी दिल्यानंतर सुप्रिया सुळे, अरविंद केजरीवाल, संजय निरुपम यांची प्रतिक्रिया)

रितेश याने सलग दोन ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. निर्भयाचे पालक, मित्रमंडळी आणि प्रियजनांसह माझी प्रार्थना आहे. खूप वेळ वाट पाहावी लागली मात्र अखेर न्याय मिळाला, असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

रितेश देशमुख ट्विट:

 

तर दुसऱ्या ट्विटमध्ये रितेश म्हणतो की, "कठोर कायदा आणि शिक्षा तसंच लवकर न्याय मिळण्यासाठी जलद न्यायसेवा हाच अशा प्रकारच्या भयंकर कृत्यांचा विचार करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण करण्याचा एकमेव मार्ग आहे.

निर्भयाच्या दोषींना शिक्षा झाल्यानंतर तिची आई आशादेवी, वडील बद्रीनाथ आणि वकील सीमा कुशवाह यांच्यासह अनेकांनी तिहार जेल बाहेर आनंद व्यक्त केला. तसंच देशात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या शिक्षेमुळे अशा प्रकारच्या राक्षसी प्रवृत्तींना चाप बसण्यास नक्कीच मदत होईल.