Rishi Kapoor Admitted: अभिनेते ऋषी कपूर प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईच्या Reliance Foundation Hospital मध्ये दाखल; रणधीर कपूर यांनी 'चिंतेचं कारण' नसल्याची दिली माहिती

त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. ऋषी कपूर यांचे बंधू रणधीर कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

ऋषि कपूर (Photo Credits: Twitter)

अभिनेता इरफानच्या निधनानंतर बॉलिवूडच्या चाहत्यांसाठी चिंता वाढवणारी अजून बातमी येऊन धडकली आहे. काल (30 एप्रिल) च्या रात्री दक्षिण मुंबईच्या Reliance Foundation Hospital मध्ये अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. ऋषी कपूर यांचे बंधू रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान मागील वर्षभरापासून अधिक काळ अमेरिकेमध्ये त्यांच्यावर कर्करोगासाठी उपचार होते. दरम्यान सध्या हॉस्पिटलमध्ये ऋषी कपूर यांच्यासोबत त्यांची पत्नी नितू कपूर या आहेत.

रणधीर कपूर यांनी PTI या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, आता ऋषी कपूर यांची प्रकृती स्थिर आहे. श्वास घ्यायला त्रास होत असल्याच्या तक्रारीवरून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान काही वृत्तसंस्थांनीही ऋषी कपुर यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचं सांगितलं आहे. कर्करोगाशी लढा देऊन 11 महिने, 11 दिवसांनतर ऋषी कपूर मायदेशी परतले; Watch Video.

ऋषी कपूर यांना सप्टेंबर 2018 मध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर वर्षभरानंतर ते भारतात परतले. दरम्यान या काळातही त्यांना दोनदा हॉसपिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दिल्लीत इंफेक्शन झाल्याने तर मुंबईमध्ये व्हायरल फिव्हरमुळे त्यांना काही काळ हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं.

अभिनेते ऋषी कपूर यांनी काही दिवसांपूर्वी हॉलिवूडचा सिनेमा 'द इंटर्न' याच्या रिमेकमधून पुन्हा रसिकांच्या भेटीला येईन असं म्हटलं होतं. या सिनेमात त्यांच्यासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोन झळकणार आहे.