IPL Auction 2025 Live

Raju Srivastava Passes Away: लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन; 10 ऑगस्टपासून दिल्लीच्या एम्स मध्ये होते उपचाराधीन

'मैने प्यार किया', 'बाजीगर', 'बोब्बे टू गोवा', ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपैया’ अशा चित्रपटात त्यांनी काम केले.

Raju Srivastava (Image source: Instagram)

लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांचे नुकतेच निधन झाले आहे. 58 वर्षीय राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट 2022 रोजी व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना दिल्ली एम्समध्ये (Delhi AIIMS) दाखल करण्यात आले. इतके दिवस त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते, त्यानंतर ते शुद्धीवरही आले होते पण नंतर सातत्याने त्यांच्या प्रकृतीमध्ये चढ-उतार होत होते. राजू यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा तर करत होतेच, याशिवाय राजू यांच्या उत्तम आरोग्यासाठी कुटुंबीय पूजा-पाठदेखील करत होते. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. आज  राजू श्रीवास्तव यांना मृत घोषित करण्यात आले.

माध्यमांच्या वृत्तानुसार,  डॉक्टरांनी त्यांच्या मेंदूचे सीटी स्कॅन केले तेव्हा मेंदूच्या एका भागात सूज दिसून आली. त्यांचे मोठे भाऊ सीपी श्रीवास्तव यांनी सांगितले की, मेंदूला सूज आल्याने तिथे पाणी आढळले आहे. डॉक्टरांनी प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले होते. राजू यांचे पीआरओ गरवीत नारंग यांनी सांगितले की, न्यूरोलॉजी विभागातील विशेष डॉक्टरांचे पथक 24 तास त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. न्यूरो डॉ. आंचल श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते.

राजू यांना गेल्या चार दिवसांपासून ताप होता. बुधवारी सायंकाळी त्यांना थोडा दिलासा मिळाला. राजू यांच्या डोळ्यात आणि घशात थोडी हालचाल झाली. डोळ्याच्या रेटिनाची हालचाल हे सकारात्मक लक्षण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु नंतर मागील काही दिवसांपसून त्यांची  तब्येत खालावत गेली.

दरम्यान, राजू श्रीवास्तव 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून मनोरंजन उद्योगात सक्रिय आहेत, परंतु 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'च्या पहिल्या सीझनपासून ते रातोरात लोकप्रिय झाले. 'मैने प्यार किया', 'बाजीगर', 'बोब्बे टू गोवा', ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपैया’ अशा चित्रपटात त्यांनी काम केले. राजू श्रीवास्तव 'बिग बॉस' सीझन 3 मध्ये देखील सहभागी झाले होते. सध्या श्रीवास्तव हे उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष होते.