ईद निमित्ताने सलमान खान आणि जॉन अब्राहमची होणार टक्कर; Republic Day च्या दिवशी अभिनेत्याने केली 'सत्यमेव जयते 2' च्या प्रदर्शनाची घोषणा

सत्यमेव जयते 2 च्या टीमकडून आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ईद 14 मे 2021 च्या निमित्ताने भेटू, असंही जॉनने ट्विटमध्ये लिहिलं आहे.

जॉन अब्राहम आणि सलमान खान (Image Credit: Instagram/Facebook)

आज भारतात 72 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. या खास प्रसंगी प्रत्येकजण देशवासियांचे अभिनंदन करीत आहे. अशातचं आता या खास प्रसंगी बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने (John Abraham) एक मोठी घोषणा केली आहे. खरं तर, सन 2021 मध्ये जॉन आता सलमान खानशी थेट स्पर्धा करण्याचा निर्धार करत आहे. कारण आता हे दोघे एकाच दिवशी आपला चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. होय, जॉनने आज ट्विट करत त्यांचा 'सत्यमेव जयते 2' (Satyameva Jayate 2) हा चित्रपट यंदा ईद (Eid) च्या निमित्ताने प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सलमान खानने सोशल मीडियावर घोषणा केली होती की, त्यांचा राधे हा चित्रपट ईदच्या निमित्ताने चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत जॉननेदेखील आपला चित्रपट ईदला प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं आहे. साहजिकचं हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याने दोन्ही चित्रपटात स्पर्धा होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक नेमकी कोणता चित्रपट पाहायला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जॉन अब्राहमने ट्वीट करून 'तन मन धन' हे 'जन गण मन' पेक्षा अधिक असल्याचं म्हटलं आहे. सत्यमेव जयते 2 च्या टीमकडून आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ईद 14 मे 2021 च्या निमित्ताने भेटू, असंही जॉनने ट्विटमध्ये लिहिलं आहे. (वाचा - Republic Day Movies: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी 'हे' हिंदी चित्रपट झाले होते रिलीज; बॉक्स ऑफिसवर रचला होता इतिहास)

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन झाल्यापासून चित्रपटगृहांत कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. प्रत्येक निर्माता प्रेक्षकांचा मूड समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. काही निर्मात्यांनी आपले चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केले आहेत. सध्या केंद्र सरकारने चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे यावेळी सलमान खानच्या राधे चित्रपटाची टक्कर जॉनच्या सत्यमेव जयते 2 चित्रपटाशी होणार आहे. त्यामुळे कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.