Instagram Rich List 2021: विराट कोहली ठरला इंस्टाग्रामद्वारे सर्वाधिक कमाई करणारा भारतीय; जाणून घ्या Priyanka Chopra किती रुपये घेते 

इन्स्टाग्रामवर (Instagram) त्याच्या फॉलोअर्सला पाहून याचा अंदाज येऊ शकतो. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विराटचे 13 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Priyanka Chopra and Virat Kohli in Instagram Rich List 2021 (Photo Credits: Instagram)

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) चाहते केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आहेत. इन्स्टाग्रामवर (Instagram) त्याच्या फॉलोअर्सला पाहून याचा अंदाज येऊ शकतो. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विराटचे 13 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मिडिया कमाईच्या बाबतीतही तो भारतीयांमध्ये अव्वल ठरला आहे. शेड्यूलिंग टूल HopprHQ च्या इन्स्टाग्राम रिचलिस्ट 2021 (Instagram Rich List 2021) मधून हे समोर आले आहे. या यादीनुसार विराट इन्स्टाग्रामवरील एका स्पॉन्सर्ड पोस्टद्वारे 5 कोटींची कमाई करतो. दोन वर्षांपूर्वी त्यांना एका पोस्टसाठी त्याला सुमारे 1.35 कोटी रुपये मिळायचे.

म्हणजेच, केवळ दोन वर्षांत एका इन्स्टाग्राम पोस्टबाबतची त्याची कमाई तीन पटीने वाढली आहे. या रिचलिस्टच्या पहिल्या 20 मध्ये विराट एकमेव भारतीय आहे, जो 19 व्या क्रमांकावर आहे. पोर्तुगालचा स्टार स्ट्रायकर क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) इंस्टाग्राम रिचलिस्ट 2021 मध्ये पहिल्या स्थानावर आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रायोजित पोस्टद्वारे तो 11.9 कोटी रुपये कमावत आहे.

नुकतेच इंस्टाग्रामवर रोनाल्डोचे 300 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. हा विक्रम करणारा तो जगातील पहिला आणि एकमेव व्यक्ती ठरला आहे. सर्वाधिक फॉलोअर्स आणि कमाईच्या यादीत डब्ल्यूडब्ल्यूई स्टार ड्वेन जॉन्सन दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याचे 24 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर एरियाना ग्रान्डे आहे. या यादीमध्ये पुढे काइली जेनर, सेलेना गोम्स, किम कर्दाशियन, जस्टिन बीबर, केंडल जेनर, टेलर स्विफ्ट, जेनिफर लोपेझ, ख्लो कर्दाशियन, निकी मिनाज आणि मायले सायरस यांचा समावेश आहे.

एका अहवालानुसार, मार्च 2019 ते मार्च 2020 दरम्यान रोनाल्डो इन्स्टाग्रामवर सर्वाधिक मानधन घेणारा सेलिब्रिटी होता. त्याची जास्तीत जास्त कमाई स्पॉन्सर्ड पोस्टद्वारे होती. त्याने जवळजवळ 50.3 मिलियन डॉलरची कमाई केली होती. 2019 मध्ये रोनाल्डो त्याच्या प्रत्येक इंस्टाग्राम पोस्टद्वारे 6.73 कोटी रुपये कमावत होता, म्हणजेच, इंस्टाग्राम पोस्टबाबतची त्याची कमाई दोन वर्षांत दुप्पट झाली आहे.

या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या पहिल्या 100 लोकांविषयी बोलायचे तर, विराट व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा यामध्ये समावेश आहे. प्रियंका 27 व्या स्थानावर असून, ती एका पोस्टसाठी तीन कोटी रुपये घेते.