'माझी कर्मभूमी मुंबईवरील प्रेम सिद्ध करण्याची मला गरज नाही, मुंबई मला यशोदेसारखी, जिने मला दत्तक घेतले आहे'- कंगना रनौत
यातूनच पुढे तिने मुंबई पोलीस व मुंबई (Mumbai) बाबत वादग्रस्त वक्यव्य केले. मुंबईची तुलना तिने ‘पाकिस्तान व्याप्त काश्मीर’ शी केली होती.
सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्युनंतर कंगना रनौतने (Kangana Ranaut) सोशल मिडियाद्वारे या प्रकरणाबाबत आपली मते व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. यातूनच पुढे तिने मुंबई पोलीस व मुंबई (Mumbai) बाबत वादग्रस्त वक्यव्य केले. मुंबईची तुलना तिने ‘पाकिस्तान व्याप्त काश्मीर’ शी केली होती. त्यानंतर आता कंगनाला अनेकांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. नुकतेच सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) आणि सम्युअल मिरांडा (Samuel Miranda) यांना नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने अटक केली असल्याची बातमी आली आहे. त्यानंतर कंगनाने, ‘माझे हेतू लोकांना माहित आहेत आणि मला माझ्या कर्मभूमी मुंबईबद्दलचे माझे प्रेम सिद्ध करण्याची गरज नाही.’ अशा आशयाचे ट्वीट केले आहे.
आपल्या ट्वीटमध्ये ती म्हणते, ‘महाराष्ट्रासह सर्वत्र असलेल्या मित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याजवळ शब्द नाहीत. त्यांना माझा हेतू ठाऊक आहेत आणि मला माझी कर्मभूमी मुंबईवरील प्रेम सिद्ध करण्याची गरज नाही. मुंबई मला नेहमीच यशोदेसारखी भासते, जिने मला दत्तक घेतले आहे. जय मुंबई जय महाराष्ट्र.’
पहा ट्वीट -
नक्की काय आहे प्रकरण –
याआधी कंगनाने ट्वीट केले होते की, तिला 'मूव्ही माफिया' पेक्षा मुंबई शहरातील पोलिसांची जास्त भीती वाटत आहे. त्यावर खासदार व शिवेसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी, ‘इतकीच जर भीती वाटत असेल मुंबईला येऊ नको’, असा टोला लगावला होता. त्यानंतर राऊत यांच्या ट्वीटबाबतच्या ‘इंडिअन एक्स्प्रेस’च्या बातमीचा हवाला देत कंगनाने म्हटले होते की, ‘शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला खुली धमकी दिली आहे आणि मला मुंबईला परत न येण्यास सांगितले आहे. आधी मुंबईच्या रस्त्यावर ‘आझादी ग्राफीटी’ आणि त्यानंतर आता मला खुली धमकी, का मुंबई ‘पाकिस्तानव्याप्त काश्मीर’सारखी भासत आहे?’
कंगनाच्या या ट्वीटनंतर मनसेचे अमेय खोपकर, गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार प्रताप सरनाईक अशा अनेक नेत्यांनी ट्वीट करत कंगनाचा समाचार घेतला होता. इतकेच नाही तर शिवसेना दिंडोशी विधानसभा क्षेत्राच्यावतीने अभिनेत्री कंगना रनौतविरोधात आंदोलन पुकारले गेले. तिच्या फोटोला जोडे मारले गेले. त्यावर कंगनाने ट्वीट केले होते की, ‘सुशांत आणि साधूंच्या हत्येनंतर आता प्रशासनावरील माझ्या मतांसाठी माझ्या पोस्टर्सला चप्पलांनी मारहाण केली गेली. असे दिसते की मुंबईला रक्ताचे व्यसन आहे.’
त्यानंतर महाराष्ट्राबद्दलचा अभिमान दर्शवण्यासाठी, आपल्या ‘राणी लक्ष्मीबाई’ चित्रपटाचा हवाला देत कंगनाने म्हटले, ‘मी हिंदी सिनेमाच्या इतिहासातील पहिली अभिनेत्री/दिग्दर्शक आहे, जिने मराठा अभिमान शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाईंना मोठ्या पडद्यावर आणले.’ पुढे ती म्हणते. ‘महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही, महाराष्ट्र त्याचाच आहे ज्याने मराठी अभिमान बाळगला आहे. मी सांगते की मी मराठा आहे, कोणाला काही करायचे असेल ते करा.’ (हेही वाचा: '9 सप्टेंबरला येत आहे मुंबईत, कोणाच्या बापाची हिम्मत असेल तर अडवून दाखवा'-अभिनेत्री कंगना रनौत)
तर अशा ट्वीटवॉर मध्ये #indiawithkanganaranaut हा हॅशटॅग ट्रेंड व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर लगेचच शौविक चक्रवर्ती आणि सम्युअल मिरांडा यांच्या अटकेची बातमी आली. कंगनासाठी ही एक आनंदाची बातमी असून, ‘मला माझ्या कर्मभूमी मुंबईबद्दलचे माझे प्रेम सिद्ध करण्याची गरज नाही.’ असे ट्वीट तिने केले.