Hrithik Roshan Buys Apartments: अभिनेता हृतिक रोशनने मुंबईमधील पॉश भागात खरेदी केले तब्बल 38,000 चौरस फूटाचे दोन फ्लॅट्स; किंमत पाहून डोळे होतील पांढरे

हृतिक रोशनने मुंबईत दोन नवीन अपार्टमेंट्स खरेदी केले आहेत. वृत्तानुसार, हृतिकने जुहू वर्सोवा लिंक रोडवरील मन्नत नावाच्या इमारतीत हे दोन अपार्टमेंट्स खरेदी केले आहेत

Hrithik Roshan | (Picture Credit: Instagram)

सध्या अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) त्याने केलेल्या एका मोठ्या गुंतवणुकीमुळे चर्चेत आहे. हृतिक रोशनने मुंबईत दोन नवीन अपार्टमेंट्स खरेदी केले आहेत. वृत्तानुसार, हृतिकने जुहू वर्सोवा लिंक रोडवरील मन्नत नावाच्या इमारतीत हे दोन अपार्टमेंट्स खरेदी केले आहेत. महत्वाचे म्हणजे या अपार्टमेंट्ससाठी हृतिकने तब्बल 97.5 कोटी रुपये मोजले आहेत. ही दोन्ही अपार्टमेंट तीन मजल्यांमध्ये पसरलेली आहेत आणि त्यातील एक पेंटहाऊस आहे. हृतिक या दोन्ही जागांना एकत्र करण्याची योजना आखत आहे. हृतिक रोशन सध्या जुहूच्या प्राइम बीच हाऊसमध्ये भाड्याच्या घरात राहत आहे. माहितीनुसार, हृतिक रोशन यासाठी दरमहा 8.25 लाख रुपये भाडे भरतो.

हृतिकने 27,534.85 चौरस फूट जागेतील फ्लॅटसाठी 67.5 कोटी दिले आहेत. त्याचवेळी अभिनेत्याने दुसर्‍या फ्लॅटसाठी 30 कोटी दिले आहेत, जो 11,165.82 चौरस फूट भागात पसरलेला आहे. हृतिक लवकरच त्यांचे नूतनीकरण करणार आहे. या मालमत्तेची खास बाब म्हणजे अपार्टमेंटला अरबी समुद्राचा व्ह्यू आहे. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, बिल्डरने हृतिकला या जागांसह 10 कार पार्किंग आणि एक विशेष लिफ्ट देखील दिली आहे. या जागांसाठी हृतिक रोशनने 1.95 कोटी मुद्रांक शुल्क भरले आहे. दोन्ही फ्लॅटसाठी त्याला दोनदा नोंदणी करावी लागली. (हेही वाचा: हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांना कोरोना विषाणूची लागण; तब्येत स्थिर असल्याची माहिती)

सध्या ही इमारत निर्माणाधीन असून त्यामध्ये कोणत्याही सुविधा नाहीत. हृतिकने घेतलेली घरे 14, 15 आणि 16 व्या मजल्यावर आहेत. दरम्यान, हृतिकच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटी वॉर चित्रपटामध्ये दिसला होता. या अ‍ॅक्शन फिल्ममध्ये हृतिकसोबत टायगर श्रॉफही होता. आता हृतिक लवकरच आपल्या सुपरहिरो चित्रपटाची सुरुवात करणार आहे. त्याचे वडील राकेश रोशन यांनी ‘क्रिश’ फ्रँचायझीच्या पुढील चित्रपटाची घोषणा केली आहे.