67th Filmfare Awards Nominees List: फिल्मफेअरमध्ये 'शेरशाह', '83', 'सरदार उधम' आणि 'रश्मी रॉकेट'चे वर्चस्व; जाणून घ्या किती श्रेणींमध्ये मिळाले नामांकन
कंगना राणौत, कियारा अडवाणी, परिणीती चोप्रा, विद्या बालन आणि तापसी पन्नू यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत नामांकने मिळाली आहेत.
67th Filmfare Awards Nominees List: 67 व्या फिल्मफेअर पुरस्कारांसाठी सिद्धार्थ मल्होत्राचा 'शेरशाह', रणवीर सिंगचा '83' चित्रपट टॉपर ठरला आहे. दोन्ही चित्रपटांना अनुक्रमे 19 आणि 15 नामांकने मिळाली आहेत. याशिवाय विकी कौशलच्या 'सरदार उधम' 13 आणि तापसी पन्नूच्या 'रश्मी रॉकेट' ला 11 नामाकंन मिळाले. रविवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
शेरशाह, 83, सरदार उधम या चित्रपटांची सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी स्पर्धा असेल. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या श्रेणीसाठी कबीर खान, सुजित सरकार, विष्णुवर्धन आणि आकाश खुराणा यांच्यात लढत असेल. सर्वोत्कृष्ठ अभिनेत्यांमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, रणवीर सिंग, विकी कौशल आणि धनुष यांना नामांकन मिळाले आहे. (हेही वाचा - Raju Srivastav Health Update: राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक; AIIMS च्या संचालकांनी दिली मोठी अपडेट)
याशिवाय कंगना राणौत, कियारा अडवाणी, परिणीती चोप्रा, विद्या बालन आणि तापसी पन्नू यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत नामांकने मिळाली आहेत. तसेच सीमा पाहवा यांच्या चित्रपटालाही सर्वोत्कृष्ट कथेसाठी नामांकने मिळाले आहे. पंकज त्रिपाठी यांना दोन नामांकने मिळाली आहेत. यात सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेचा समावेश आहे.
दरम्यान, रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि मनीष पॉल हे यावर्षीच्या फिल्मफेअर अवॉर्ड्सचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत. 30 ऑगस्ट रोजी मुंबईत हा कार्यक्रम होणार आहे. यात वरुण धवन, विकी कौशल, कियारा अडवाणी आणि दिशा पटानी सारखे कलाकार देखील परफॉर्म करताना दिसणार आहेत.