Fearless And United-Guards: PUBG बॅन झाल्यानंतर Akshay Kumar घेऊन येत आहे स्वदेशी अॅक्शन गेम FAU:G, जाणून घ्या खासियत
पबजीवर बंदी घातल्यानंतर, त्या गेमला टक्कर देणारे हे पूर्णतः भारतीय अॅप असेल.
भारत सरकारने चिनी अॅप्सवर (Chinese Apps) बंदी घालून शेजारच्या देशावर आणखी एक डिजिटल स्ट्राईक केला आहे. भारत सरकारने 118 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. या अॅप्समध्ये देशातील सर्वात लोकप्रिय गेमिंग अॅप पबजी (PUBG) वरही बंदी घातली गेली आहे. या गेमवरील बंदीमुळे अनेक गेमर्सची निराशा झाली आहे. मात्र आता बॉलिवूडचा 'खिलाडी कुमार' म्हणजेच अक्षय कुमारने (Akshay Kumar) अशा गेमरसाठी एक चांगली बातमी दिली आहे. म्हणजेच जर का तुम्ही पबजी ळाळला मीस करत असाल, तर लवकरच अक्षय कुमार आपल्यासाठी Fearless And United-Guards (FAU-G) हा गेम घेऊन येत आहे.
याबाबत अक्षयने ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यामध्ये तो म्हणतो, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर’ चळवळीस माझा पाठिंबा आहे. आता अॅक्शन गेम सादर करण्यास मला अभिमान वाटत आहे. या खेळाचे नाव ‘Fearless And United-Guards FAU-G’ असे असेल. या गेमद्वारे करमणुकीव्यतिरिक्त खेळाडू आमच्या सैनिकांच्या बलिदानाबद्दलही शिकतील. या गेमच्या मार्फत मिळवलेल्या निव्वळ उत्पन्नाच्या 20% रक्कम ‘भारत के वीर’ ट्रस्टला (Bharat Ke Veer) दान केली जाईल.’ ‘भारत के वीर’ ट्रस्ट भारताच्या शूर सैनिकांना मदत करते.
अक्षय कुमार ट्वीट -
FAU:G (फौजी) नावाचे हे अॅप अक्षय कुमारच्या मार्गदर्शनात बनविण्यात येणार आहे, जे मल्टीप्लेअर अॅक्शन गेम असेल. पबजीवर बंदी घातल्यानंतर, त्या गेमला टक्कर देणारे हे पूर्णतः भारतीय अॅप असेल. (हेही वाचा: भारतामध्ये खेळू शकता पबजी गेमची कोरियन आवृत्ती, जाणून घ्या हे अॅप डाऊनलोड करण्याची प्रक्रिया)
आपल्या अॅपबद्दल अक्षय कुमार म्हणाला की, 'तरूणांसाठी त्यांच्या मनोरंजनासाठी गेमिंग हा अत्यावश्यक भाग झाला आहे. आम्हाला आशा आहे की FAU:G च्या माध्यमातून जेव्हा कोणी हा गेम खेळेल तेव्हा आपल्या देशातील सैनिकांच्या बलिदानाबद्दल देखील त्याला माहिती मिळेल. FAU:G पुढील महिन्यात म्हणजे, ऑक्टोबरमध्ये सुरू करण्याची तयारी आहे. हा गेम गुगल प्ले स्टोअर आणि Apple स्टोअर या दोन्ही ठिकाणी उपलब्ध असेल.’