Akshay Kumar On Farmers Protest: केंद्र सरकारच्या समर्थनार्थ अभिनेता अक्षय कुमार मैदानात, सोशल मीडियावर कृषी कायद्यास पाठिंबा

मात्र, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने शेतकरी आंदोलनासंदर्भात सरकारच्या बाजूचं समर्थन केलं आहे.

Akshay kumar (Photo Credit - File Photo)

Akshay Kumar On Farmers Protest: गेल्या दोन महिन्याहून अधिक काळावधीपासून दिल्लीत शेतकरी सरकारने संमत केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. अशातचं आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक कलाकारांनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन केलं आहे. मात्र, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने शेतकरी आंदोलनासंदर्भात सरकारच्या बाजूचं समर्थन केलं आहे. अक्षय कुमारने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात ट्विट करताना म्हटलं आहे की, 'शेतकरी हा आपल्या देशाचा एक अत्यंत महत्वाचा भाग असून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत ते स्पष्ट आहेत. त्यामुळे मतभेद निर्माण करणाऱ्या प्रत्येकाकडे लक्ष देण्याऐवजी एक मैत्रीपूर्ण ठरावाचे समर्थन करूया.' या ट्विटमध्ये अक्षय कुमारने #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे हॅशटॅग वापरले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शेतकरी आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करून काही शक्ती आपला अजेंडा चालवित आहेत. या विषयांवर कोणतेही मत घेण्यापूर्वी, संपूर्ण माहिती मिळवणे चांगलं असल्याचंही म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालय ट्विटरवर #Indiatogether #IndiaAgainstPropoganda हे हॅशटॅग प्रमोट करत आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानानंतर आज अनेक बड्या कलाकारांनी त्याचे समर्थन करत आहेत. (वाचा - Farmer Protest in India: शेतकरी आंदोलनाचा मुद्दा परदेशात गाजला; पॉप स्टार रिहाना नंतर ग्रेटा थनबर्गनेही केलं शेतकऱ्यांचं समर्थन)

दरम्यान, अमेरिकन पॉप स्टार रिहाना यांनी शेतकरी आंदोलनाला आपले समर्थन व्यक्त केले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटी सातत्याने शेतकरी आंदोलनाबाबतील आपले मत व्यक्त करत आहेत. भारतीय कार्यकर्त्या लिसिप्रिया कांगजूम यांनीही ट्विटरवर शेतकरी आंदोलनाचे उघडपणे समर्थन केले. त्यानंतर ग्रेटा थनबर्गनेदेखील आपल्या ट्विट अकाऊंटवरून शेतकरी आंदोलनाचं समर्थन केलं.