Adipurush Teaser Controversy: आदिपुरुष चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; अपमानकारक दृश्ये न हटवल्यास BJP नेत्याचा कारवाईचा इशारा
‘दिग्दर्शकाने वाल्मिकींचे रामायण, कंबा रामायण किंवा तुलसीदासांचे रामायण किंवा इतर अनेक व्याख्यांचे संशोधन केले नाही याचे मला दुःख आहे.'
सुपरस्टार प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनन स्टारर 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाचा टीझर रविवारी (2 ऑक्टोबर) प्रदर्शित झाला. या चित्रपटातील विविध पात्रांचे लूक पाहिल्यानंतर त्याच्यावर बहिष्कार घालण्याची मागणी सुरू झाली आहे. सोशल मीडियावर युजर्सनी चित्रपट आणि त्यातील पात्रांना ट्रोल केले आहे. भाजप, हिंदू महासभा आणि युजर्सनी सैफ अली खानच्या रावण अवतारावर संताप व्यक्त केला आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेने त्याच्या लुकची तुलना दहशतवादी खिलजीशी केली आहे.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आदिपुरुष चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. याबाबत मी चित्रपट निर्माते ओम राऊत यांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. आक्षेपार्ह सिन्स न हटवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. गृहमंत्री म्हणाले- 'मी आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर पाहिला असून त्यात आक्षेपार्ह दृश्ये आहेत.'
ते पुढे म्हणाले- 'आमच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू ज्या प्रकारे दाखवले जातात ते चांगले नाही. हनुमानजींचे अंगवस्त्र चामड्याचे दाखवण्यात आले आहे, जो श्रद्धेवर थेट हल्ला आहे.' यापूर्वी अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या मालविका अविनाश यांनी ओम राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. आदिपुरुष चित्रपटात रामायण चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटात ज्या पद्धतीने रावणाचे चित्रण करण्यात आले आहे ते चुकीचे असल्याचे त्या म्हणाल्या.
(हेही वाचा: Adipurush Teaser: थक्क करणारी दृश्य आणि डोळे दिपवणारे VFX, प्रभासच्या आदिपुरुषचा टीझर प्रदर्शित)
मालविका यांनी चित्रपटातील रावणाच्या चित्रीकरणावर आक्षेप घेत पुढे म्हटले. ‘दिग्दर्शकाने वाल्मिकींचे रामायण, कंबा रामायण किंवा तुलसीदासांचे रामायण किंवा इतर अनेक व्याख्यांचे संशोधन केले नाही याचे मला दुःख आहे. आम्ही आमच्या चित्रपटांवर संशोधन केले. रावण कसा होता हे दाखवणारे अनेक कन्नड चित्रपट, तेलुगु चित्रपट, तामिळ चित्रपट आहेत.’