52nd International Film Festival of India: गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान चालणार भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; जगभरातून निवडलेल्या 15 चित्रपटांमध्ये 2 मराठी चित्रपटांचा समावेश (See List)
जगभरातील अतिशय महत्वाच्या आणि मानाच्या चित्रपट महोत्सवांपैकी हा एक असल्याने त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे
52 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (52nd International Film Festival of India) म्हणजेच इफ्फी यंदा 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात होणार आहे. जगभरातील अतिशय महत्वाच्या आणि मानाच्या चित्रपट महोत्सवांपैकी हा एक असल्याने त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या महोत्सवाशी संबंधित सर्व अपडेट्स सरकारकडून सातत्याने दिले जात आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली होती की, प्रथमच IFFI ने मोठ्या OTT प्लॅटफॉर्मना देखील महोत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. आता या महोत्सवात वर्षातील सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मसाठी स्पर्धक चित्रपटांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
IFFI च्या 52 व्या आवृत्तीत 15 आंतरराष्ट्रीय चित्रपटांची लाईन-अप जारी केली आहे. फीचर-लेंथ फिक्शन चित्रपटांच्या यादीमध्ये भारत आणि परदेशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा समावेश आहे. महोत्सवात जगभरातील उत्कृष्ट फिचर-लेन्थ चित्रपटांची निवड करण्यात येते, त्यातून एकाला पुरस्कार दिला जातो. या उत्सवाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. या महोत्सवात गोल्डन पीकॉक आणि इतर पुरस्कारांसाठी या 15 चित्रपटांची एक्मेंकांशी लढत होते. महत्वाचे म्हणजे यंदा अशा 15 चित्रपटांमध्ये दोन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.
हे आहेत 15 चित्रपट
एनी डे नाऊ | दिग्दर्शक : हमी रमजान | फिनलंड
शार्लोट | दिग्दर्शक : सायमन फ्रँको | पॅराग्वे
गोदावरी | दिग्दर्शक: निखिल महाजन | मराठी, भारत
एंट्रेगलडे | दिग्दर्शक : राडू मुंटियन |रोमानिया
लँड ऑफ ड्रीम्स | दिग्दर्शक: शिरीन नेशात आणि शोजा अझरी | न्यू मेक्सिको, अमेरिका
लीडर | दिग्दर्शक : कटिया प्रिविजेन्सव | पोलंड
मी वसंतराव | दिग्दर्शक: निपुण अविनाश धर्माधिकारी | मराठी, भारत
मॉस्को डझ नॉट हॅप्पन | दिग्दर्शक :दिमित्री फेडोरोव | रशिया
नो ग्राउंड बीनीथ द फीट | दिग्दर्शक : मोहम्मद रब्बी म्रिधा | बांगलादेश
वन्स वी वेअर गुड फॉर यू | दिग्दर्शक: ब्रँको श्मिट | क्रोएशिया, बोस्निया आणि हर्जेगोविना
रिंग वंडेरिंग | दिग्दर्शक : मसाकाझू कानेको | जपान
सेव्हिंग वन व्हू वॉज डेड | दिग्दर्शक : वाक्लाव कद्रन्का | झेक प्रजासत्ताक
सेमखोर | दिग्दर्शक : एमी बरुआ | दिमासा, भारत
द डॉर्म | दिग्दर्शक: रोमन वास्यानोव | रशिया
द फर्स्ट फॉलन | दिग्दर्शक : रॉड्रिगो डी ऑलिव्हेरा |ब्राझील
हे चित्रपट विविध श्रेणीतील पुरस्कारांच्या स्पर्धेत असतील, उदा:
- सर्वोत्कृष्ट चित्रपट (सुवर्ण मयूर)- या पुरस्काराचे स्वरुप आहे रोख पारितोषिक रु. 40,00,000/- दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यात समान वितरण केले जाईल. दिग्दर्शकांना रोख रकमेव्यतिरिक्त सुवर्ण मयूर आणि प्रमाणपत्र प्राप्त होईल. निर्मात्याला रोख रकमे व्यतिरिक्त प्रमाणपत्र प्राप्त होईल.
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: रौप्य मयूर, प्रमाणपत्र आणि 15,00,000/ रुपयांचे पारितोषिक
- सर्वोत्कृष्ट अभिनेता: रौप्य मयूर, प्रमाणपत्र आणि 10,00,000/- रुपयांचे पारितोषिक
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: रौप्य मयूर, प्रमाणपत्र आणि 10,00,000/- रुपयांचे पारितोषिक
- विशेष ज्युरी पुरस्कार: रौप्य मयूर, प्रमाणपत्र आणि 15,00,000/- रुपयांचे पारितोषिक
एखाद्या चित्रपटाला (चित्रपटाच्या कोणत्याही पैलूसाठी ज्याला ज्युरी पुरस्कार /स्वीकृती देऊ इच्छितो) किंवा एखाद्या व्यक्तीला (चित्रपटातील त्याच्या/तिच्या कलात्मक योगदानासाठी) हा पुरस्कार आहे. हा पुरस्कार एखाद्या चित्रपटाला मिळाल्यास तो चित्रपटाच्या दिग्दर्शकाला प्रदान केला जाईल.
IFFI हा आशियातील सर्वात जुना आणि भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मानला जातो. हा महोत्सव गोवा राज्य सरकार आणि भारतीय चित्रपट उद्योग यांच्या सहकार्याने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालय (DFF) द्वारे आयोजित केला जाईल.