Unemployment: पदवीधर युवकाला तब्बल 300 जणांनी नाकारली नोकरी; हजारो रुपये खर्च करून शहरभर लावली स्वतःची होर्डिंग्ज, जाणून घ्या काय घडले पुढे
ख्रिसला पदवीनंतर नोकरी मिळाली नाही, त्यामुळे त्याने स्वतःची होर्डिंग्ज लावण्याची युक्ती अवलंबली. विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर ख्रिसने अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला पण त्याला नोकरी मिळाली नाही.
अनेक देशांमध्ये बेरोजगारीची (Unemployment) समस्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यात कोरोना विषाणूमुळे अजूनच भर पडली आहे. बेरोजगार माणूस नोकरी मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करतो. अनेक कार्यालयांच्या चकरा मारण्यापासून ते प्रार्थनेपर्यंत तो सर्व काही करतो. नोकरी मिळवण्यासाठी अनेकजण विविध प्रकारे स्वतःचे मार्केटिंग करतात. असेच उत्तर आयर्लंडमधील (Northern Ireland) एका युवकाने नोकरी मिळवण्यासाठी वापरलेली भन्नाट आयडिया सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या युवकाने चक्क ‘मला कामावर घ्या’ अशा आशयाचे होर्डिंग्ज शहरभर लावले.
ख्रिस हर्किन (Chris Harkin) असे या युवकाचे नाव असून तो 24 वर्षांचा आहे. ख्रिसला पदवीनंतर नोकरी मिळाली नाही, त्यामुळे त्याने स्वतःची होर्डिंग्ज लावण्याची युक्ती अवलंबली. विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर ख्रिसने अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला पण त्याला नोकरी मिळाली नाही. एवढेच नाही तर त्याला एका आठवड्यात तब्बल 300 जणांनी जॉब नाकारला. अशाप्रकारे पुन्हा पुन्हा नोकरीसाठी अर्ज करून कंटाळलेल्या या मुलाने नोकरी मिळवण्यासाठी शहरभर स्वतःची होर्डिंग लावले.
या होर्डिंगसाठी ख्रिसने सुमारे 40 हजार रुपये खर्च केले. या बोर्डवर त्याने त्याच्या फोटोसह लिहिले आहे, 'कृपया मला हायर करा.’ या बिलबोर्डमध्ये ख्रिसने स्वतःबद्दल काही महत्त्वाची माहितीही सांगितली आहे. त्याने बोर्डवर लिहिले आहे की तो पदवीधर आणि अनुभवी कंटेंट रायटर आहे. 24 वर्षीय ख्रिस सप्टेंबर 2019 पासून नोकरीच्या शोधात होता. मात्र, बिलबोर्ड लावल्यानंतर आणि त्यावर इतके पैसे खर्च करूनही ख्रिसला नोकरी मिळाली नाही. (हेही वाचा: देशात एक महिन्यात 15 लाख बेरोजगार; CMIE अहवालात खुलासा, ऑगस्ट महिन्यात बेकारीचा दर 8.32%)
नोकरी मिळवण्यासाठी होर्डिंग्ज लावण्याची ही कल्पना ख्रिसला त्याच्या बहिणीशी झालेल्या संभाषणादरम्यान मिळाली. त्याची बहीण सोशल मीडिया मॅनेजर आहे आणि होर्डिंग लावण्याचे काम करत होती.