डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू रॉजर स्टोन यांना खोटारडेपणाच्या आरोपाखाली अटक

Roger Stone and Donald Trump | (Photo courtesy: archived, edited, representative image)

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे विश्वासू रॉजर स्टोन (Roger Stone) यांना शुक्रवारी (26 जानेवारी) अटक करण्यात आली. स्टोन यांचे रशियाशी संबंध असल्याच्या आरोपाखाली विशेष वकील रॉबर्ट मूल्लर (Robert Mueller) यांच्याकडून सुरु असलेल्या चौकशी प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. स्टोन यांच्याविरोधात एकूण सात आरोप ठेवण्या आले आहेत. यात अमेरिकी काँग्रेससोबत खोटे बोलणे आणि चौकशीत अडथळा आणणे या आरोपांचाही समावेश आहे. किंबहून त्या सात आरोपांपैकी हेच आरोप मोठे आणि तितकेच महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.

रॉजर स्टोन यांच्यावरील आरोपांमध्ये दावा करण्यात आला आहे की, ते अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचे अप्रत्यक्ष सहकाही होते. ट्रम्प यांच्या प्रचार यंत्रणेत स्टोन यांची भूमिका महत्त्वाची होती. प्रचारादरम्यान, ट्रम्प यांच्या विरोधक हिलरी क्लिंटन (Hillary Clinton) यांच्या प्रचार अभियानातून काही ई-मेल चोरण्यात आले होते. ते मेल ते प्रसारित करणार होते. ट्रम्प यांच्या प्रचार अभियानाशी संबंधीत अज्ञात वरिष्ठ अधिकाऱ्याने स्टोन यांच्याशी संपर्क साधून चोरण्यात आलले ई-मेल प्रसिद्ध करण्याच्या तारखेबाबत चर्चा केली होती.

चोरी करण्यात आलेले ई-मेल विकिलीक्स या संस्थेने प्रसिद्ध केले होते. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या काही आठवडे आधी चोरण्यात आलेले हे ई-मेल विकिलीक्सद्वारे प्रसिद्ध करण्याबाबत स्टोन यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. विशेष वकील मूलर यांनी असेही म्हटले होते की, क्लिंटन यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेचे प्रमुख जॉन पोडेस्टा यांचे ई-मेल अकाउंट रशियाच्या गुप्तचर यंत्रणांनी हॅक केले होते. (हेही वाचा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा; वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्ताने खळबळ)

दरम्यान, स्टोन यांच्यावर विकिलीक्स आणि कथीत ई-मेल हॅक करणारे रशियन अधिकारी यांच्याशी संगनमत केल्याचा आरोप ठेवण्यात आला नाही. परंतू, त्यांच्यावर विकिलीक्सचे ई-मेल प्रसिद्ध करण्यासंबंधी आपल्या वक्तव्यात वारंवार बदल आणि चुकीची वक्यव्य केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. चौकशी प्रकरणात त्यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी गुप्तचर प्रकरणांच्या चौकशी समितीसमोर चुकीची वक्तव्य केली होती.