Abdul Salam Bhuttavi

मुंबईतील 26/11 च्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा (Mumbai Terrorist Attack)लष्कर-ए-तोएबाचा (Lashkar-e-Taiba) कुख्यात दहशतवादी अब्दुल सलाम भुट्टावीचा (Abdul Salam Bhuttavi) मृत्यू झाला आहे. तो पाकिस्तानच्या तुरुंगात कैद होता. अब्दुल सलाम भुट्टावी हा हाफिज सईदचा जवळचा सहकारी मानला जात होता.  याचा पाकिस्तानच्या तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे. अब्दुल सलाम भुट्टावी 78 वर्षांचा होता. अब्दुल सलाम भुट्टावी 2020 पासून टेरर फंडीग प्रकरणी म्हणजेच दहशवतवादाला आर्थिक खतपाणी घालण्यासाठी शिक्षा भोगत होता.

अब्दुल सलाम भुट्टावीला संयुक्त राष्ट्र संघाने 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं होतं. त्यानंतर त्याला दहशतवादाला आर्थिक मदत केल्याप्रकरणी पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. या प्रकरणात लष्कर-ए-तोएबाचा संस्थापक हाफिज सईदचा मेहुणा अब्दुल रहमान मक्की याच्यासह अब्दुल सलाम भुट्टावीला न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. ऑगस्ट 2020 मध्ये अब्दुल सलाम भुट्टावीला 16 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

2008 साली मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या अटकेनंतर अब्दुल सलाम भुट्टावीनं 2002 आणि 2008 मध्ये लष्कर-ए-तोएबाचा कार्यकारी प्रमुख म्हणून काम पाहिलं होतं. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यामध्ये अब्दुल भुट्टीवीचाही हात असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. 2008 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना भुट्टीवीनं प्रशिक्षण दिलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, हाफिज सईदच्या अटकेनंतर अब्दुल सलाम भुट्टावी लष्कर-ए-तोएबाचा म्होरक्या होता. 2011 मध्ये भुट्टावीनं स्वत: दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबासाठी 20 वर्षे काम केल्याची कबुली दिली होती. लष्करशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुट्टावीचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला.