Kim Jong Un Serious Disease: नॉर्थ कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनला जडला 'हा' गंभीर आजार; दारू आणि सिगरेटच्या आहारी- Reports

देशात अन्नधान्याची टंचाई आहे. धान्याचे भाव वाढले आहेत. दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, देशात गुन्हेगारी, आत्महत्या आणि उपासमारीने होणाऱ्या मृत्यूंमध्येही वाढ झाली आहे.

Kim Jong Un | (PC - ANI)

उत्तर कोरियाच्या (North Korea) जगासमोर फार कमी बातम्या येतात. त्यात त्यांचा सर्वोच्च नेता किम जोंग उन (Kim Jong Un) याच्याबद्दल तर फारच कमी माहिती बाहेर येते. आता तज्ञांचा असा दावा आहे की, किम जोंग उन काही गंभीर आजारांशी झुंज देत आहे. किम जोंग उन खूप मद्यपान करतो आणि नियमितपणे सिगारेट्स पितो. ब्लूमबर्गनुसार, दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने बुधवारी (31 मे) सांगितले की उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उन झोपेच्या विकाराने म्हणजेच निद्रानाशाने (Insomnia) ग्रस्त आहे. त्याने दारूचे अतिसेवन केल्यामुळे हा प्रकार घडला, यासोबतच त्याला निकोटीनचेही व्यसन जडले आहे.

नॅशनल इंटेलिजेंस सर्व्हिस (NIS) चा हवाला देत आउटलेटने उत्तर कोरियाचा हुकूमशहा झोपेच्या अभावाने त्रस्त असल्याचे वृत्त दिले आहे. किम जोंग उन याच्या आजारपणामुळे, अधिकारी सतत परदेशी उपचारांबाबत माहिती गोळा करण्यात गुंतले आहेत. अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की, या अपचारांनी किम जोंगला बरे केले जाऊ शकते. विविध प्रकारच्या औषधांची माहितीही ते गोळा करत आहेत. त्यांच्या औषधांच्या यादीत झोलपिडेमचाही समावेश आहे. झोपेच्या विकारांवर या औषधाचा वापर केला जातो.

दक्षिण कोरियाच्या सत्ताधारी पीपल पॉवर पार्टीचे खासदार आणि संसदीय गुप्तचर समितीचे कार्यकारी सचिव यू संग-बम यांनी सांगितले की, उत्तर कोरियाने मोठ्या प्रमाणात विदेशी सिगारेट आयात केल्या आहेत. ते म्हणाले की उत्तर कोरियाने अलीकडे मार्लबोरो आणि डनहिलसह इतर ब्रँड्सच्या मोठ्या प्रमाणात परदेशी सिगारेट आयात केल्या आहेत. याशिवाय यामध्ये पारंपारिकपणे अल्कोहोलसह दिल्या जाणार्‍या हाय-एंड स्नॅक्सचाही समावेश आहे. यू संग-बम यांनी किमचे वजनही वाढल्याची माहिती दिली. त्यांच्या मते, उत्तर कोरियाच्या नेत्याचे वजन 140 किलोपेक्षा जास्त झाले आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, यूने सांगितले की, किम दारू आणि धूम्रपानावर अवलंबून आहे. यामुळे तो झोपेच्या कमतरतेच्या समस्येशी झुंजत आहे. गुप्तचर समितीच्या एका सदस्याने सांगितले की, किम जोंग उन 16 मे रोजी सार्वजनिक कार्यक्रमात दिसला होता, जिथे त्याच्या डोळ्याभोवती काळ्या वर्तुळाच्या खुणा दिसल्या होत्या. तो खूप थकलेला दिसत होता. (हेही वाचा:  युगांडात राष्ट्रपती योवेरी मुसेवेनी यांनी अँटी-एलजीबीटीक्यू विधेयकावर केली स्वाक्षरी, एलजीबीटीक्यू आता गुन्हा म्हणून ओळखला जाणार)

दरम्यान, किम सत्तेत आल्यापासून उत्तर कोरियाच्या लोकांची दुर्दशा वाढत असल्याचेही यू म्हणाले. देशात अन्नधान्याची टंचाई आहे. धान्याचे भाव वाढले आहेत. दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, देशात गुन्हेगारी, आत्महत्या आणि उपासमारीने होणाऱ्या मृत्यूंमध्येही वाढ झाली आहे.