TikTok चे सीईओ Kevin Mayer यांचा राजीनामा; ट्रम्प प्रशासनाविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यानंतर घेतला निर्णय
काही महिन्यांपूर्वीच त्यांनी चायनिय व्हिडिओ शेअरिंग अॅप टिकटॉकच्या सीईओ पदाची सुत्रे हाती घेतली होती.
टिकटॉक सीईओ (TikTok CEO) Kevin Mayer यांनी राजीनामा दिला आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी चायनिय व्हिडिओ शेअरिंग अॅप टिकटॉकच्या सीईओ पदाची सुत्रे हाती घेतली होती. न्युयॉर्क टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, राजीनामा देत असल्याची माहिती मेअर यांनी मेलद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांना दिली. "खूप जड मनाने मला तुम्हाला सर्वांना अशी माहिती द्यायची आहे की, मी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे." असे मेअर यांनी आपल्या मेलमध्ये म्हटले आहे.
टिकटॉकची पॉरन्ट कंपनी ByteDance ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कंपनी बंद करण्याच्या सूचना आल्यामुळे मेअर यांनी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. कर्मचाऱ्यांना केलेल्या मेलमध्ये मेअर असे पुढे म्हणाले की, "गेल्या काही आठवड्यामध्ये राजकीय वातावरण खूप बदलले आहे. या राजकीय वातावरणाचा कॉर्पोरेट क्षेत्रात किती परिणाम होईल याची पूर्णपणे तपासणी केल्यानंतर आणि मी हाती घेतलेल्या सुत्रांवर देखील किती परिणाम होईल, याचा विचार करुन मी हा निर्णय घेतला आहे."
मेअर यांच्या राजीनाम्यानंतर टिकटॉकच्या जनरल मॅनेजर Vanessa Pappas या कंपनीची सुत्रं हाती घेतील. टिकटॉक या कंपनीने ई-मेल स्टेटमेंट द्वारे मेअर यांच्या राजीनाम्याची पुष्टी दिली असून राजकीय घडमोडींमुळे मेअर यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
ByteDance चे फाऊंडर आणि सीईओ Yiming Zhang यांनी एका वेगळ्या पत्रात असे लिहिले की, "जागतिक घडामोडींमुळे कंपनीला विशेषतः भारत आणि अमेरिकेत स्थिरता मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ट्रम्प यांनी प्रसिद्ध व्हिडिओ शेअरिंग अॅप टिकटॉकचे व्यवहार बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर कंपनीने ट्रम्प प्रशासनाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे."
6 ऑगस्ट रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी ByteDance कंपनीचे अमेरिकेतील सर्व व्यवहार बंद करावे असे आदेश दिले होते आणि यासाठी कंपनीला 45 दिवसांची मूदत देण्यात आली होती. त्यानंतर ByteDance कंपनीने टिकटॉकचे सर्व व्यवहार 90 दिवसांत बंद करावेत, असा आदेश जाहीर केला होता.