Nepal Earthquake Update: नेपाळमध्ये भूकंपामुळे मोठ नुकसान, आतापर्यंत 128 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी
भूकंप झाल्यापासून बचाव दल बचाव कार्यात गुंतले आहे.
Nepal Earthquake Update: पश्चिम नेपाळ (Nepal) मध्ये झालेल्या भूकंपामुळे (Earthquake) आतापर्यंत 128 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. नेपाळच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की रुकुम पश्चिममध्ये 35 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जाजरकोट जिल्ह्यात 90 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भूकंप झाल्यापासून बचाव दल बचाव कार्यात गुंतले आहे. शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास नेपाळच्या पश्चिम भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 इतकी मोजण्यात आली आहे.
नेपाळच्या नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 11.47 वाजता भूकंपाचा धक्का बसला आणि त्याचा केंद्रबिंदू जाजरकोटमध्ये जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर होता. भारत आणि चीनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भारतातही सुमारे 40 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. (हेही वाचा -Nepal Eatrthquake: नेपाळमध्ये भुकंपाचे धक्के, तीव्रता रिश्टर स्केल 6.4, घटनेत 72 लोक दगावले)
दरम्यान, नेपाळची राजधानी काठमांडू आणि परिसरात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. जाजरकोट हे काठमांडूपासून पश्चिमेला सुमारे 500 किलोमीटर अंतरावर आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच काठमांडूतील लोक घराबाहेर पडले. यावेळी लोक रस्त्यावर घाबरलेले दिसले. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. नेपाळच्या पीएमओने ट्विट केले, पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी शुक्रवारी रात्री 11.47 वाजता जाजरकोटच्या रामीदांडा येथे झालेल्या भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि घरांच्या हानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. जखमींना तात्काळ बचाव आणि मदतीसाठी तिन्ही सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत.
तथापी, हिमालयीन देश नेपाळमध्ये भूकंप सामान्य आहेत. 2015 मध्ये, 7.8 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने संपूर्ण देश हादरला होता. यात 12,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता तर हजारो घरे उद्ध्वस्त झाली होती.