H1B Visa Row: डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली असून आता त्यांचे नवे सरकार कठोर इमिग्रेशन कायदे लागू करण्याच्या तयारीत आहे. यावेळी रिपब्लिकन पक्षात एच-१बी व्हिसाबाबत मतभेद समोर येत आहेत. हा व्हिसा टेक्निकल क्षेत्रासारख्या विशेष क्षेत्रात काम करणाऱ्या परदेशी व्यावसायिकांसाठी आहे. एच-१बी व्हिसामुळे परदेशी कामगारांना अमेरिकेत तांत्रिक आणि विशेष क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. हा व्हिसा 3 वर्षांसाठी दिला जातो, जो 3 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. ग्रीन कार्ड अर्जांतर्गत व्हिसाधारकांना त्यांचा कालावधी वाढविण्याची ही मुभा आहे. मात्र, नोकरी गेल्यास एच-१बी धारकांना ६० दिवसांच्या आत नवी नोकरी शोधावी लागते किंवा देश सोडावा लागतो.
रिपब्लिकन पक्षात मतभेद
एच-१बी व्हिसावरून ट्रम्प समर्थकांमधील मतभेद स्पष्टपणे दिसून येत आहेत. इलॉन मस्क यांच्यासारखे उद्योगपती याला पाठिंबा देत असताना स्टीव्ह बॅनन सारखे टीकाकार ते बंद करण्याची बाजू मांडत आहेत. मस्क यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी हा कार्यक्रम आवश्यक असल्याचे सांगत या कार्यक्रमाचे समर्थन केले. त्याचवेळी बॅनन यांनी एच-१बी हे 'फसवे' असल्याचे सांगत यामुळे अमेरिकनांच्या नोकऱ्या हिरावून घेतल्या चे म्हटले आहे.
एच-१बीबाबत ट्रम्प यांची भूमिका
न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "एच-1बी व्हिसा हा एक विलक्षण कार्यक्रम आहे. मात्र, २०१७ ते २०२१ या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी हा व्हिसा मर्यादित करण्याचा प्रयत्न केला.
याचा फटका कुणाला बसणार?
एच-१बी व्हिसाधारकांमध्ये भारतीय व्यावसायिकांची संख्या सर्वाधिक असून, त्यांच्यावर या धोरणाचा थेट परिणाम होणार आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्यांमुळे अनेक एच-१बी व्हिसाधारकांना आपला कायदेशीर दर्जा टिकवून ठेवण्यासाठी आधीच संघर्ष करावा लागत आहे. एच-१बी वादामुळे परदेशी व्यावसायिक आणि अमेरिकी उद्योगांवर मोठा परिणाम होऊ शकतो. ट्रम्प प्रशासनाच्या नव्या धोरणांमध्ये व्हिसाधारकांनी सतर्क राहून त्यांचे हक्क समजून घेणे आवश्यक आहे.