Contraceptive Pill: मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी गर्भनिरोधक गोळी घेतल्याने 16 वर्षीय मुलीचा मृत्यू
लैला खान (Layla Khan) असे या मुलीचे नाव असून ती 16 वर्षांची आहे.
मासिक पाळीच्या वेदना (Menstrual Pain) कमी करण्यासाठी घेतलेली गर्भनिरोधक गोळी (Contraceptive Pill) एका पौगंडावस्थेतील मुलीच्या मृत्यूस कारण ठरल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. लैला खान (Layla Khan) असे या मुलीचे नाव असून ती 16 वर्षांची आहे. यूकेस्थित लैला हिने गर्भनिरोधक गोळी घेतल्यापासून तीन आठवड्यानंतर तिच्या पोटात काही समस्या आढळून आल्या. ही समस्या आढळल्यानंतर अवघ्या पुढच्या 48 तासांमध्ये शरीरातील रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याने तिचे निधन झाले. महाविद्यालयीन तरुणी असलेली लैला पाठिमागील काही महिन्यांपासून मासिक पाळीच्या त्रासातून जात होती. वेदनांवर आराम मिळविण्यासाठी तिने मैत्रिणींच्या सल्ल्यावरुन औषधे घेतली. ज्याचा गंभीर परिणाम झाला आणि तिच्या जीववर बेतले.
द टेलीग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, लैला खानने 25 नोव्हेंबरपासून गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास सुरुवात केली. ज्यामुळे तीव्र वेदना कमी झाल्या. मात्र, 5 डिसेंबरपासून तिला डोकेदुखी, पोटदुखी आणि इतर काही शारीरिक समस्या जाणवू लागल्या. दरम्यान, पुढच्या काहीच काळात तिला उलट्या होऊ लागल्या. जेव्हा लैलाला दर 30 मिनिटांनी उलट्या होऊ लागल्या आणि तिची प्रकृती अधिकच बिघडू लागली तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तिला अत्यंत वेदना होत असूनही डॉक्टरांनी तिच्या पोटातच काही समस्या असल्याचे निदान केले. त्यानुसारच औषधे लिहून दिली. तसेच, 'फार चिंतेचे कारण नाही' असा दिलासाही दिला. (हेही वाचा, Oral Contraceptives: तोंडावाटे घ्यावयाची गर्भनिरोधक औषधे महिलांसाठी ठरु शकतात घातक- अभ्यास)
दरम्यान, घरी परतलेल्या लैला हिच्या वेदाना आणखीच वाढल्या. प्रचंड वेदनेने ती किंचाळू लागली. तिला तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात नेण्याची तयारी केली. मात्र, ती बाथरुममध्येच कोसळली. कुटुंबीयांनी तिला त्याच अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. ग्रिम्सबीच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन केल्यानंतर तिच्या मेंदूमध्ये रक्ताची गुठळी आढळून आली. 13 डिसेंबर रोजी शस्त्रक्रिया करूनही लैलाला दुसऱ्या दिवशी ब्रेन डेड घोषित करण्यात आले. (हेही वाचा, Male Contraceptive Pill: संशोधकांनी विकसित केल्या पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्या; थांबवणार शुक्राणूंची हालचाल, जाणून घ्या सविस्तर)
लैलाची मावशी, जेन्ना ब्रेथवेट, यांनी तिच्या आगोदरच्या डॉक्टरांनी दिलेल्या उपचारांविषयी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दुसऱ्या बाजूला तिच्या शिक्षकांनी तिचे वर्णन 'ऑक्सफर्डची संभाव्य विद्यार्थिनी' असे केले आहे. दरम्यान, ख्रिसमसच्या काहीच दिवस आगोदर तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लैलाच्या कुटुंबाने तिचे अवयव दान केले. अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेद्वारे पाच जणांना जीवदान मिळाल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. दरम्यान, कोणतीही औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. याबाबत समाजात जनजागृती व्हावी अशी भावना लैलाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.