Chinmoy Krishna Das Prabhu Arrest: ढाका पोलिसांनी चिन्मय दास यांना ताब्यात घेतलं, हिंदूंमध्ये संताप, इस्कॉनच पंतप्रधान मोदींना मदतीचे आवाहन

30 ऑक्टोबर रोजी चित्तगावमधील कोतवाली पोलिस ठाण्यात चिन्मय दास यांच्यासह 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हिंदू रॅलीत बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Photo Credit- X

Chinmoy Krishna Das Prabhu Arrest: बांगलादेश इस्कॉनशी (Iskcon )संबंधित धार्मिक नेता चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना सोमवारी दुपारी अटक करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्यावर देशद्रोह आणि जातीय सलोखा बिघडवल्याचा गुन्हा दाखल आहे. चिन्मय प्रभू (Chinmoy Krishna Das Prabhu) यांचे सहाय्यक आदि प्रभू यांनी सांगितले की, त्यांना ढाकातील मिंटू रोड येथील डीबी कार्यालयात नेण्यात आले. चिन्मय प्रभूच्या सुटकेसाठी ढाकात निदर्शने सुरू झाली आहेत. आंदोलकांनी ढाकातील सेहाबागमध्ये मुख्य रस्ता अडवला. 'आम्ही न्यायासाठी लढणार' अशा घोषणा देत त्यांना निदर्शने केली आहेत. याशिवाय दिनाजपूर आणि चितगावमध्येही रास्ता रोको करून घोषणाबाजी करण्यात येत आहे.

पोलिसांनी चिन्मय प्रभू यांना विमानतळावरून अटक केली. बांगलादेशच्या मीडियानुसार, चिन्मय प्रभू ढाका ते चितगावला हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते. तेथून त्याला डिटेक्टिव पोलिसांनी अटक केली. या अटकेच्या कारवाई दरम्यान, डीबी पोलिसांनी त्यांना कोणतेही अटक वॉरंट दाखवले नाही असे घटनास्थळी उपस्थित असलेल्या इस्कॉन सदस्यांनी म्हटले आहे.

चिन्मय प्रभू यांना चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी म्हणूनही ओळखले जाते. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात त्यांनी बांगलादेशात अनेक निदर्शने केली. दरम्यान, ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या गुप्तहेर शाखेचे (डीबी) अतिरिक्त पोलिस आयुक्त रेझौल करीम मल्लिक यांनी कारवाईबद्दल त्यांची बाजू मांडताना म्हटले की, पोलिसांच्या विनंतीनंतर चिन्मय कृष्ण दास यांना अटक करण्यात आली.

बांगलादेश सनातन जागरण मंचने 25 ऑक्टोबर रोजी चितगाव येथे रॅली काढली होती. त्या रॅलीला चिन्मय कृष्ण दास यांनीही संबोधित केले. रॅलीनंतर लगेचच बीएनपी नेते फिरोज खान यांनी चित्तगावमध्ये चिन्मय कृष्णा दास यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला. राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

या पोस्टमध्ये इस्कॉनने पंतप्रधान मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, बांगलादेशातील भारतीय दूतावास आणि बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांना टॅग केले. बांगलादेश पोलिसांनी चिन्मय कृष्ण दास यांना सोमवारी ढाका येथील हजरत शाहजलाल विमानतळ परिसरातून अटक केली.

बांगलादेशातील हिंदू समाजात संताप

30 ऑक्टोबर रोजी चित्तगावमधील कोतवाली पोलिस ठाण्यात चिन्मय दाससह 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हिंदू समुदायाच्या रॅलीत बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तर दुसरीकडे चिन्मय दास यांच्यावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे बांगलादेशातील हिंदू समाजात संताप व्यक्त होत आहे. चितगावमधील चेरागी पहाड चौकात शेकडो लोक रस्त्यावर उतरले. लोकांनी त्याच्या सुटकेची मागणी केली.